उरण : रामप्रहर वृत्त – जासई श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि. 30) बैठक झाली.
या मिटिंगमध्ये आताच झालेल्या चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे जासई गावातील जवळजवळ 130 ते 135 घरे पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पाण्याखाली गेली व त्यामुळे घरांचे अतोनात नुकसान झाले. जासई नाका ते दास्तान फाटा आणि चिर्ले ते दास्तान फाटा अशा दोन्ही बाजूने रोडचे रुंदीकरण झाल्यामुळे रोडची उंचीसुद्धा वाढलेली आहे. रोडचे काम करीत असताना ठेकेदाराने पाण्याचा निचरा होणारे नाले बंद केले आहेत. त्याचप्रमाणे दास्तान फाटा बेलपाडा जी खाडी आहे तीसुद्धा गाळाने भरली आहे, तिचेसुद्धा कॅनल टाईप काँक्रिटीकरण करणे गरजेचे आहे, असे सुरेश पाटील म्हणाले.
मिटिंग चालू असतानाच सुरेश पाटील यांनी सिडको, जेएनपीटीचे वरिष्ठ तसेच तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्याबरोबर फोनवरून चर्चा केली व त्वरित कारवाई करण्यात यावी; अन्यथा आम्हाला आक्रमक लढा उभारावा लागेल, असे निक्षून सांगितले तसेच ज्या शेतकर्यांच्या रोडच्या रूंदीकरणासाठी जमिनी गेल्या आहेत व त्याचा मोबदला अजूनपर्यंत मिळाला नाही. त्यासाठी लवकरच सिडको आणि एनएचआय अधिकारी वर्गाबरोबर मिटिंग लावून प्रलंबित प्रश्न निकाली लावण्याचा प्रयत्न करा, अन्यथा ठेकेदारांची कामे बंद करून जासई नाक्यावर रास्ता रोको आंदोलन करावे लागेल, असा ठराव संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी व गावकर्यांनी एकमताने केला.
या बैठकीस माजी सरपंच बाळाशेठ पाटील, मेघनाथ म्हात्रे, धर्मा पाटील, यशवंत घरत, माणिक म्हात्रे, सुभाष घरत, सुनील घरत, नामदेव पाटील, निलेश म्हात्रे आदी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्व समस्यांसंदर्भात मंगळवारी अधिकारी वर्ग पाहणीसाठी येणार आहेत.