उरण ः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कामाशिवाय इतरत्र फिरू नये. मास्क वापरावे. वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा. स्वतःसह परिवाराची काळजी घ्यावी. सोशल डिस्टन्सिंग पाळावे. पोलीस यंत्रणा आणि शासनाच्या सूचनांचे पालन करून त्यांना सहकार्य करावे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी नगर परिषद विशेष लक्ष देत आहे. तसेच नागरिकांना घरातच राहा, सुरक्षित राहा, असे आवाहन उरण शहर भाजप अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा यांनी केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध उपाययोजना करीत आहेत. त्याचप्रमाणे उरणचे आमदार महेश बालदी यांच्या सूचनेप्रमाणे उरण नगर परिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उरण नगर परिषद हद्दीत स्वच्छता, साफसफाई करण्यात आली आहे. बाजारपेठेत नागरिकांनी सामान खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता राखणे याबद्दल जनजागृती केली जात आहे. उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप उरण तालुका अध्यक्ष तथा गटनेता नगरसेवक रवी भोईर, उरण शहर महिला अध्यक्षा संपूर्णा थळी, सर्व नगरसेवक-नगरसेविका, कर्मचारी, अधिकारी विविध उपाययोजना करीत आहेत. त्या अनुषंगाने नागरिकांनीही उरण नगर परिषदेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.