Breaking News

रायगडातील खासगी डॉक्टर उदासीन

कोरोना रुग्णांना सेवा देताना शासकीय रुग्णालयांवर ताण

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात कोविड-19ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासकीय यंत्रणा आपल्या परीने काम करीत आहे, परंतु अद्यापही  जिल्ह्यातील ग्रामीण तसेच निमशहरी भागांमधील खासगी डॉक्टर कोरोनाबाधित रुग्णांना सेवा देण्यात पुढे येत नसल्याचे चित्र आहे. त्यांच्या उदासीनतेमुळे शासकीय रुग्णालयांवर ताण पडत आहे.
रायगड जिल्ह्यात रविवार (दि. 27) पर्यंत एक लाख 58 हजार 457 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यात 45 हजार 544 रुग्णांना कोविड-19ची लागण झाल्याचे आढळले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यापैकी 39 हजार 752 रुग्ण बरे झाले. एक हजार 220 जणांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात चार हजार 572 अ‍ॅक्टीव रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यापैकी  दोन हजार 815 रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी शासकीय यंत्रणा प्रयत्न करीत आहे. बेडची कमतरता पडू नये यासाठी अलिबाग येथील  जिल्हा सामान्य रुग्णालयात 100 बेडचे अद्ययावत असे जिल्हा कोविड सेंटर तयार करण्यात येत आहे. 40 बेड ऑक्सिजन यंत्रणेचे, तर 60 बेडला व्हेंटिलेटर, ऑक्सिजनयुक्त बनविण्यात आलेले आहे. ग्रामीण भागतील रुग्णांना तालुका पातळीवर उपाचार मिळावेत यासाठी ग्रामीण रुग्णालयांमध्येदेखील रुग्णांना विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे, मात्र खासगी डॉक्टर या रुग्णांना उपचार देण्यास पुढे येत नाहीत.
पनवेल महापालिका हद्दीत कोविड-19 रुग्णांना उपचार देण्यासाठी खासगी डॉक्टर पुढे आले आहेत, पण ग्रामीण व निमशहरी भागांमध्ये खासगी डॉक्टर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करीत नाहीत.  खोपोलीमध्ये दोन व कर्जतध्ये एका अशा केवळ तीन खासगी रुग्णालयांमध्येच कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. अलिबागमध्ये एका रुग्णालयाचा प्रस्ताव आला आहे. खासगी डॉक्टर उपचार करीत नसल्यामुळे ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयांवर ताण पडत आहे. ग्रामीण तसेच निमशहरी भागातील डॉक्टर कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात पुढे आल्यास शासकीय रुग्णालयांवरील ताण कमी होईल.

जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिका हद्दीतील काही खाजगी रुग्णालये कोविड-19च्या रुग्णांवर उपचार देण्यास पुढे आले आहेत, पण जिल्ह्यातील ग्रामीण तसेच निमशहरी भागातील खासगी डॉक्टर आपल्या रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करीत नाहीत. ग्रामीण भागातील खासगी रुग्णालयांनी कोरोना  रुग्णांवर उपचार करण्याबाबतचे प्रस्ताव आमच्याकडे पाठवावेत. त्या रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा असल्यास त्यास परवानगी दिली जाईल.  
-निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड  

Check Also

पनवेलमध्ये शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला गळती लागली …

Leave a Reply