उरण : रामप्रहर वृत्त
करंजा टर्मिनलजवळ भरणारा अनधिकृत मच्छी बाजार बंद केल्याबद्दल उरणच्या स्थानिक मच्छीविक्रेत्यांनी आमदार महेश बालदी यांचे आभार मानले आहेत. उरण तालुक्यातील शेकडो मच्छीविके्रत्या महिलांनी सोमवारी (दि. 28) आमदार बालदी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन त्यांना धन्यवाद दिले. कोळी समाजाचे नेते जयवंत कोळी सोबत होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार आणि वाहतूक बंद असल्याने करंजा आणि परिसरातील मच्छीमारांना मासळी विक्री करता येत नव्हती. त्यामुळे ते अर्थिक अडचणीत सापडले होते. येथील स्थानिक मच्छीमारांनी आपली मासळी जवळच्याच करंजा बंदराजवळ विकण्यासाठी तात्पुरता बाजार सुरू केला. तालुक्यातील लोकांनादेखील लॉकडाऊनमध्ये समुद्रातील ताजी मासळी अल्प मिळत असल्याने या बाजारात मासळी खरेदी करण्यासाठी झुंबड उडत असे, मात्र लॉकडाऊन संपल्यानंतरही हा बाजार सुरू राहिल्याने उरण शहरातील आणि परिसरातील मच्छीविक्रेत्यांवर त्याचा परिणाम होऊ लागला. शिवाय करंजा बंदरात मासळी विकण्यासाठी डहाणू, पालघर भागातील मच्छीमार येऊ लागल्याने बाहेरील मच्छीमारांचा या बाजाराला वेढा पडला होता. परिणामी उरण तालुक्यातील शेकडो मच्छीविक्रेत्या महिला बेरोजगार होण्याच्या मार्गावर होत्या. अखेर याबाबत त्यांनी उरणचे आमदार महेश बालदी यांच्याकडे आपली कैफियत मांडली.
आमदार महेश बालदी यांनी तालुक्यातील मच्छीविक्री करणार्या कोळी, आगरी महिलांचे म्हणणे ऐकून घेतले. गोरगरीब मच्छीविक्रेत्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी ताबडतोब उरण पोलिसांना पत्र देऊन बाहेरील लोकांचा समावेश असलेला अनधिकृत मासळी बाजार बंद करण्याची मागणी केली. आमदार बालदी यांच्या प्रयत्नामुळे हा अनधिकृत बाजार बंद झाला आणि शेकडो स्थानिक मच्छीविक्रेत्यांचा रोजगार वाचला.
रोजीरोटी वाचविल्याबद्दल शेकडो मच्छीमार महिलांनी आमदार महेश बालदी हे आपला भाऊ व आदर्श लोकसेवक असल्याचे म्हणत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले. या वेळी अनेक महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याचे दिसून आले.
Check Also
नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर
उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper