नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आयपीएलमध्ये सध्या ऋषभ पंत खूप चर्चेत आहे. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळलेली 78 धावांची खेळी अजूनही सार्यांच्या स्मरणात आहे. धोनी आणि इतर दिग्गज क्रिकेटपटूंकडून त्याने धडे घेतले आहेत, पण सध्या पंतच एका लोकप्रिय खेळाडूला क्रिकेटच्या स्ट्रोक्सचे धडे देताना दिसत आहे. तो खेळाडू आहे दिग्गज ऑलिम्पिक विजेता मायकल फेल्प्स. पंत त्याला क्रिकेटमधील ‘स्ट्रोक्स’ शिकवत आहेत. भारताचा आणि दिल्ली कॅपिटल्सचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने काही दिवसांपूर्वी दिग्गज ऑलिम्पियन मायकल फेल्प्सची भेट घेतली. या वेळी त्याने या महान जलतरणपटूला क्रिकेटमधील बारकावेदेखील सांगितले. फेल्प्सने ऑलिम्पिकमध्ये जलतरणाच्या विविध प्रकारात 2004 ते 2016 या कालावधीत तब्बल 28 पदके जिंकली. त्यातील 23 सुवर्णपदके होती. फेल्प्स काही दिवसांसाठी भारतात आला आहे. त्यामुळे त्याने भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ असणार्या क्रिकेटचे धडे शिकण्याचा प्रयत्न केला. त्याने दिल्ली कॅपिटल्सच्या सरावादरम्यान खेळाडूंची भेट घेतली.
या वेळी त्याने खेळाडूंबरोबर वेळ घालवत चर्चा केली, तसेच त्याने पंतकडून फलंदाजी शिकण्याचा आणि काही फटके मारण्याचाही प्रयत्न केला. त्याने खेळाडूंबरोबर काढलेले फोटो आणि व्हिडिओ दिल्ली कॅपिटल्स संघाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.