- द्वारकाशारदापीठाधीश्वर शंकराचार्य सदानंद सरस्वती महाराजांनी दिले आशीर्वाद
- विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभीष्टचिंतन, समाजोपयोगी उपक्रमांची रेलचेल
पनवेल ः रामप्रहर वृत्त
दानशूर व्यक्तिमत्त्व, माजी खासदार आणि समाजाच्या हृदयात अधिराज्य गाजवणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी (दि. 2) वयाची 74 वर्षे पूर्ण करत 75व्या अर्थात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले. या विशेष समयी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आध्यात्मिक, साहित्य, वैद्यकीय, सांस्कृतिक, विधी, कला, सांस्कृतिक, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांचे अभीष्टचिंतन करून दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे द्वारकाशारदापीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वती महाराज यांनी स्वतः उपस्थित राहून लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद दिले. या वेळी अनेक मान्यवरांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस म्हणजे समाजाचा वाढदिवस असे गौरवोद्गार काढले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव समितीच्या वतीने पनवेलमध्ये तीन दिवसीय भव्य अमृतमयी कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. भजन, कीर्तन, सामुदायिक हरिपाठ, गुरूतुल्य कीर्तनकार महाराजांचा सन्मान समारंभपूर्वक करण्यात आला. या महोत्सवाला वारकरी संप्रदायातील हजारोंच्या संख्येने मंडळी उपस्थित राहिली, तर दहा हजारहून अधिक भाविकांनी या कीर्तन महोत्सवाचा लाभ घेतला.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व अखिल भारतीय नाट्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला तसेच रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि योनेक्स सनराइज् यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप आणि निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या वतीने एक कृतार्थ संध्याकाळ या साहित्यिक कार्यक्रमांतर्गत कविसंमेलन परिसंवाद, सन्मान पुरस्कार सोहळा, रायगड जिल्हा युवा मोर्चाच्या वतीने वर्षभर रक्तदान शिबिर उपक्रम आयोजित करण्यात असून जिल्ह्यातील रक्ततुटवडा भरून काढण्यासाठी हा एक विशेष उपक्रम हाती घेण्यात आला असून विविध विभागात वृक्षारोपण, आरोग्य शिबिरेही आयोजित करण्यात आली. सर्वसामान्यांचे आधारवड असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हितचिंतकांची अफाट गर्दी जमली होती.

RamPrahar – The Panvel Daily Paper