Breaking News

माझे कुटुंब, माझी जबाबदारी

सर्व्हेक्षणाच्या कामात अडचणी

अलिबाग : प्रतिनिधी

राज्य शासनाने सुरु केलेली माझे कुटूंब, माझी जबाबदारी ही मोहीम रायगड जिल्ह्यात कूर्मगतीने सुरु आहे. या मोहिमेत आतापर्यंत जिल्ह्यात सात लाख 63 हजार 092 कुटूंब आहेत. यापैकी चार लाख 73 हजार कुटूंबांचे सर्वेक्षण पुर्ण झाले आहे. अपुर्‍या मनुष्यबळामुळे सर्वेक्षणाच्या कामात अनेक अडचणी येत आहेत.

कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन जनतेच्या आरोग्याची माहिती जमा करण्यासाठी राज्य सरकारने माझे कुटूंब माझी जबाबदारी ही मोहीम सुरु केली. घरोघरी जाऊन संभाव्य करोनाबाधितांचा शोध घेणे आणि त्यांच्यावर तातडीने उपचार करणे हा या योजनेच उद्देश आहे. मात्र या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या अमंलबजावणीत अनेक अडचणी येत असल्यामुळे या मोहिमेचे काम वेग घेऊ शकलेले नाही.

रायगड जिल्ह्यात सात लाख 63 हजार 092 कुटूंब आहेत. यापैकी चार लाख 73 हजार कुटूंबांचे सर्वेक्षण पुर्ण झाले आहे. तर जवळपास तीन लाख कुटूंबाचे सर्वेक्षण अद्याप शिल्लक आहे, 839 पथकांच्या माध्यमातून हे सर्वेक्षणाचे काम करण्यात येत आहे. एक हजार 694 जणांमध्ये तापाची लक्षणे आढळून आली आहेत. तर 719 जणांमधील प्राणवायूची पातळी कमी असल्याचे आढळून आले आहे. या सर्वांना पुढील आरोग्य तपासणीसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये संदर्भीत करण्यात आले आहे. 42 हजार नागरीकांना हृदयविकार, मधुमेह सारखे आजार असल्याचे निदर्शनास आले आहे. तर 856 जणांना श्वसन विकार असल्याचे आढळून आले आहे.

सर्वेक्षणाचे काम दोन टप्प्यात पूर्ण करायचे आहे. पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षण 15 ऑक्टोबर पर्यंत तर दुसर्‍या टप्प्यातील सर्वेक्षण 30 ऑक्टोबर पर्यंत पुर्ण केले जाणार आहे. मात्र सर्वेक्षणाच्या कामासाठी एक हजार 244 पथकांची आवश्यकता आहे. मात्र सध्या एक हजार 189  पथकेच प्रत्यक्ष काम करत आहेत. अपुर्‍या मनुष्यबळामुळे सर्वेक्षणाच्या कामात अनेक अडचणी येत आहेत.

माझे कुटूंब, माझी जबाबदारी उपक्रमा आंतर्गत जिल्ह्यात घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने काही ठिकाणी अद्यापही सर्वेक्षण पथके पोहोचू शकलेली नाहीत. पण पुढील दोन ते तीन दिवसात या ठिकाणी पथके पोहोचून सर्वेक्षणाचे काम पुर्ण केली जाईल.

-निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply