Breaking News

संचारबंदीतही मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे

पोलादपुरात सोशल डिस्टन्सिंगविना कामगारांचा वावर

पोलादपूर : प्रतिनिधी
कोरोनामुळे संचारबंदी लागू असताना पोलादपूर तालुक्यातील गोवेले तसेच देवळे परिसरात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते, पूल आदी विकासकामे सुरू असून सोशल डिस्टन्सिंगविना कामगारांचा तालुक्यात वावर असल्याचे दिसून येत आहे.
पोलादपूर तालुक्यातील बोरज फाटा ते देवळे रस्ता हळदुळे दाभिळचा भाग असा सुमारे 1.920 किमी. रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुरू आहे. यात रस्ता डांबरीकरणासह एक छोटा पूल आणि 20 पाइपच्या मोर्‍यांची कामे अंतर्भूत आहेत. गंभीर बाब म्हणजे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक दक्षता न घेता सोशल डिस्टन्सिंगविनाच कामगारांचा वापर केला जात आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कामगार गोवेले ग्रामपंचायत हद्दीतील साळवीकोंड येथील उंबरडोह येथे प्रातर्विधी आणि आंघोळी करीत आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरी भागातून गावाकडे स्थलांतरित झालेल्या चाकरमान्यांची सर्वाधिक संख्या साळवीकोंडमध्ये आहे. परिणामी आधीच पाणीटंचाईग्रस्त असलेल्या या परिसरात वाढलेल्या स्थलांतरित लोकसंख्येमुळे पाण्याची कमतरता भासत असून कामगारांमुळे परिसराच्या अस्वच्छतेत भर पडत आहे.
याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने तहसीलदार दीप्ती देसाई आणि पोलादपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. भूषण जोशी यांचे लक्ष वेधले. त्यावर योग्य कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply