पनवेल : वार्ताहर
बेकायदेशीररित्या खवल्या मांजरांच्या खवल्यांची तस्करी करणार्या पाच जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून पनवेल व अलिबाग वनविभागाच्या पथकाने पकडले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खवले मांजरांची खवले हस्तगत केले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरील मौजे-चिंचवण गावाचे हददीत असलेल्या क्षणभर विश्रांती हॉटेलजवळ सापळा रचून थांबले असता दोन मोटरसायकलवरून आरोपी ज्ञानेश्वर मधुकर शिवकर, (रा.खारपाले) व आरोपी प्रवीण बबन जाधव (रा.उंबर्ले) तसेच आरोपी प्रतिश सुभाष भोस्लेकर (रा.मुर) हे वरील जागेवर आले. आरोपी ज्ञानेश्वर शिवकर व प्रविण जाधव हे टिव्हीएस कंपनीची जुपिटर मोटरसायकल वरुन एक लाल रंगाची पिशवी तसेच एक पांढर्या रंगाची पिशवीमध्ये काहीतरी घेऊन आलेले होते. तर दुसर्या हॉझ कंपनीची मोटरसायकल आरोपी प्रतिश भोस्लेकर आलेला दिसला. दरम्यान ते एकमेकांच्या पिशव्या आदलाबदल करत असताना वनविभागाच्या पथकाने सापळा रचून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघेजण त्यांच्या हाती सापडले तर एक जण पळून जात असताना पाठलाग करून त्याला पकडले असता त्यांच्याकडे प्राणी खवले मांजर या वन्यप्राण्याचे खवले असल्याचे दिसून आले असता ते जप्त केले. आरोपीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.
आशिष ठाकरे, (मा. उपवनसंरक्षक, अलिबाग) यांच्या मार्गदर्शनाखाली डी. एस. सोनवणे, सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव) पनवेल, पी. बी. मरले, वनक्षेत्रपाल (संरक्षण अतिक्रमण निर्मुलन), पनवेल व वनकर्मचारी यांनी आरोपींच्या राहत्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतले तसेच त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तीन किलो खवले मांजर वन्यप्राण्याचे खवले मिळून आले. तेसुद्धा ताब्यात घेतले असून आरोपींना पोलीस कस्टडी देण्यात आली. सदर गुन्हयांचा पुढील तपास चालू आहे.