खालापूर : प्रतिनिधी
पतीच्या अकाली निधनानंतर संसाराचा गाडा चालविण्यासाठी हाती स्टेअरिंग घेणार्या नवदुर्गा संगीता सोमनाथ वाघमारे यांचा दसर्याच्या मुहूर्तावर (दि. 25) खालापूर येथील दिलासा फाऊंडेशनच्या उपाध्यक्ष आकांक्षा देशमुख यांच्या हस्ते सत्कार झाला.
मोरे आदिवासीवाडी (ता. खालापूर) येथील संगीता वाघमारे यांचे पती सोमनाथ मालवाहू (छोटा हत्ती) टेम्पो चालवायचे. त्यातून मिळणार्या उत्पन्नावर संसाराचा चालायचा. त्याला हातभार म्हणून संगीता भाजी विकायची. मात्र आठ महिन्यापूर्वी सोमनाथ यांचे निधन झाले. त्यातच लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. तीन मुलांचे पोट कसे भरायचे, संसार कसा चालवायचा हे प्रश्न निर्माण झाले. अशा परिस्थिती संगीता डगमगल्या नाहीत. त्यांनी पतीचा टेम्पो स्वतः चालवयाचा निर्णय घेतला. टेम्पोतून गावोगावी भाजी विक्री सुरू केली. तसेच माल वाहतुकही सुरू केली. त्यांच्या संसाराचा गाडा रूळावर आला आहे. दोन मुलीना बारावीपर्यंत शिक्षण दिले. एका मुलीचे लग्न केले. मुलगा सहावीत आहे. पुरूषांची मक्तेदारी असलेल्या व्यवसायात ठामपणे राहणार्या संगीता वाघमारे यांचा दसर्याच्या मुहर्तावर दिलासा फाउंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज कळमकर, सामाजिक कार्यकर्ते दिपक जगताप, दिनेश फराट, राजू देसाई, दिपक मांडवकर, काशिनाथ खराळ, मिलिंद पानपाटील यांच्यासह संगीता यांचे कुटूंबिय उपस्थित होते.