नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
जगभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने अनेक गोष्टींना आळा बसला आहे. लग्न, उत्सव, वाढदिवस, स्नेहसंमेलन आदी कार्यक्रमांना वाद्य वाजविण्यास सरकारने अद्याप परवानगी न दिल्यामुळे नवी मुंबईतील 23 बँड पथके आणि 70 बँजो पथकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या आठ महिन्यांत त्यांचे आठ ते 10 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दिवाळे कोळीवाडा-तीन, शिरवणे-दोन, घणसोली-दोन, कोपरखैरणे-दोन, गोठीवली-दोन, दिवा कोळीवाडा-एक, खैरणे बोनकोडे-एक, सानपाडा-एक, वाशी गाव-एक, सारसोळे-एक, कुकशेत-एक, जुईनगर-एक, करावे गाव-एक, बेलापूर गाव-दोन आणि तुर्भे गाव-एक असे नवी मुंबईत एकूण 23 बँड पथके, तर 70 पेक्षा अधिक बँजो पथके आहेत. गेल्या आठ महिन्यांत झालेल्या नुकसानीमुळे बँड पथकाने सरकारच्या नियमावलीन्वये वाद्य वाजविण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. सरकारने नियमावली तयार करून त्यानुसार बँड वाजविण्यास वेळ ठरवून परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. विवाह सोहळे सुरू व्हावेत त्यामुळे रोजगार उपलब्ध होऊन चार पैसे मिळतील, अशी आशा या वाजंत्री कलावंतांना आहे.नवी मुंबईत प्रत्येक बँड पथकात 20 ते 26 कलावंत आहेत. या पथकांतील 600 वाजंत्री कलावंतांवर दोन ते अडीच हजार कुटुंबे विसंबून आहेत. उत्पन्नाचे दुसरे कुठलेही साधन नसल्याने वाजंत्री कलाकारांची विवंचना होत आहे.
परवानगी देऊन आर्थिक संकट दूर करा
शासनाने बँड, बँजो कलाकारांना वाजविण्याची परवानगी देऊन उपासमार थांबवावी, अशी मागणी नवी मुंबई सामाजिक सांस्कृतिक कला प्रतिष्ठान या वाद्य कलावंतांच्या नोंदणीकृत संस्थेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन सिंह, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे.