मोहोपाडा : शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील किल्यांवर गडकोटांचे रक्षण व्हावे या हेतूने, खालापूर तालुक्यातील शिवकार्य ट्रेकर्सच्या वतीनेकिल्ले विसापूर येथे दुर्गभ्रमण करीत असताना किल्ले स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत प्लॅस्टिक, बाटल्या व अविघटनशील कचरा गोळा करण्यात आला. कड्याकपारीत, झाडाझुडपात जाऊन कचरा गोळा करण्यात आला. गडावर येणार्या पर्यटकांकडून पाणी तसेच थंड पेयाच्या बाटल्या गड परिसरात टाकून दिल्या जातात. या सर्व वस्तू गोळा करण्यात आल्या. या मोहिमेत दोन बॅगा प्लॅस्टिक व थर्माकोल सदृश अविघटनशील कचरा गोळा करून तो गडाच्या पायथ्याशी असलेल्या कचरा पेटीत आणण्यात आला. पर्यावरण रक्षण व्हावे, ऐतिहासिक वास्तुचे जतन व्हावे या भावनेने ही मोहीम राबवण्यात आली. शिवकार्य ट्रेकर्सचे संस्थापक रोहिदास ठोंबरे व त्यांचे सहकारी यांच्या मार्गदर्शनाने मोहीम राबवण्यात आली होती.
आतापर्यंत अशी मोहीम महाराष्ट्रातील अनेक गडकिल्यांवर राबवली असून दुर्गसंवर्धन व स्वच्छता या विषयावर जनजागृती करण्यात आली आहे. अभियान राबवण्यात आलेले आहे. या वेळी किल्ले विसापूर या मोहिमेत केतन भद्रीके, गजानन ठोंबरे, अभिषेक पाटील, महेंद्र ठोंबरे, रोशन ठोंबरे, मुरली लाळे, वैभव देवडे, धनंजय व अनिरुद्ध कुंभार व सूरज लाखोटी आदी सहभागी झाले होते.