मुरुड : प्रतिनिधी
एसटीचे मुरूड आगार गेल्या काही महिन्यांपासून गैरसोयींचे आगार झाले आहे. त्यातच निसर्ग चक्रिवादळाने या आगाराची पार दैना उडवली आहे. येथील गैरसोयी दूर करून आगाराची दुरुस्ती करावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा येथील समाजसेवक अरविंद गायकर यांनी एसटीच्या विभागीय नियंत्रकांना निवेदनाद्वारे दिला आहे. मुरुड हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असून, या ठिकाणी देशीविदेशी पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. येथील एसटी आगारात पर्यटक व स्थानिक प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. मात्र तेथे प्रवासी सुविधांची वानवा आहे. आगारात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, स्वच्छतागृहामध्येही पाणी नाही, पाणी साठवण टाकी अस्वच्छ आहे, स्वच्छता कर्मचारी नसल्याने संपूर्ण आगारात कचरा साठला आहे, आगारात काँक्रीटीकरण करण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे, मात्र ते अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. रेस्टरूम बंद असल्याने महिलांची गैरसोय होत आहे. यामुळे प्रवाशांत नाराजी आहे. कर्मचार्यांच्या रेस्टरूमची दुरावस्था झाली आहे. त्यांच्या स्वच्छतागृहांतही अस्वच्छता आहे, त्या ठिकाणी पाण्याची व विजेची व्यवस्था नाही. आगारातील काही संगणक बंद आहेत, ज्येष्ठ नागरिकांना स्मार्टकार्डसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. 3 जूनच्या चक्रीवादळात मुरुड आगाराची पडझड झाली आहे. त्यावेळी आरक्षण कक्षाच्या छपराचे पत्रे उडाले होते, ते अद्याप बसविण्यात आलेले नाहीत, इमारतीच्या भिंतींना भेगा पडल्या आहेत. मात्र त्याकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नाही. मुरूड एसटी आगारातील गैरसोयी दूर करण्याबाबत वेळोवेळी निवेदने देऊनसुद्धा त्याची दखल घेतली जात नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मुरुड एसटी स्थानकातील गैरसोयी दूर करून आगाराची त्वरीत दुरुस्ती करावी, अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल असे समाजसेवक अरविंद गायकर यांनी एसटीच्या विभागीय नियंत्रकांना दिलेल्या निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे.