पनवेल : वार्ताहर
पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग व अपर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी वेळोवेळी नशा मुक्त नवीमुंबई अभियाना दरम्यान गुटखा व इतर नशेली पदार्थाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने पनवेल परिसरातून लक्झरी बससह, टेम्पो कारवाई करीत मोठ्या प्रमाणात गुटखा हस्तगत केला आहे.
महाराष्ट्र मध्ये गुटखा बंदी असतानाही गुटखा विक्री करणारी अंतराज्य टोळी बाबत माहिती गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलला प्राप्त झाली होती. गुन्हे शाखा 2च्या पथकाला मध्य प्रदेशातून एका प्रवाशी लक्झरी ट्रॅव्हल्समधुन मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटखा वाहतुक करुन तो पनवेलमध्ये आणून विविध ठिकाणी टेम्पोद्वारे वितरीत केला जातो अशी मिळाल्याने गार्डन हॉटेल पनवेल येथे सापळा लावून मध्यप्रदेश येथुन लक्झरी ट्रॅव्हल्समधुन आणलेला गुटखा घेवुन जाणारा टेम्पो मिळून आला.
या टेम्पोमध्ये एकूण 6,68,32 रुपये किंमतीचा विमल व राजश्री गुटखा मिळुन आल्याने गुटखा वाहतुक करणार्या व्यक्तीकडे चौकशी करता ज्या प्रवाशी लक्सरी बस मधून हा गुटखा मध्यप्रदेश वरून वाहतूक केला, ती बस (एमपी 09 पी-0450) ही सुद्धा गुन्ह्यात जप्त करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करुन आरोपी इर्शाद सैजुद्दिन अन्सारी (32, रा. शाहबाज गाव, बेलापुर) गुटखा मागिवणारा, टेम्पो चालक राज रामा साळुंखे (38, रा. बेलापुर गाव) बस चालक अशपाक कालू (खा. व्हिले दुधी ता. धर्मपुरी जि. दहाद म. प्र) यांना अटक करण्यात आली आहे. लक्झरी बस व टेम्पोसह गुटखा मिळून एकूण 61,68,320 रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.