रेवदंडा ः प्रतिनिधी
रेवदंडा ग्रामपंचायतीने अंधाराचे साम्राज्य दूर करताना नव्याने पथदिव्यांच्या प्रकाशाची सेवा उपलब्ध केली आहे. एकूण 76 पथदिव्यांच्या प्रकाशाने रेवदंडा ग्रामपंचायतीचे अंतर्गत रस्ते उजळले आहेत. रेवदंडा ग्रामपंचायत अंतर्गत रेवदंडा बायपास रस्ता, साखळे गल्ली रस्ता, नवीन कोळीवाडा वसाहत, मोठ बंदर जे. टी. आणि चौल बांध (स्मशानभूमी रस्ता) या ठिकाणचे अंधाराचे साम्राज्य दूर करून नवीन पथदिवे उपलब्ध झाले आहेत. रेवदंडा ग्रामपंचायतीच्या 14व्या वित्त आयोग निधीतून पथदिवे बसविण्यात आले आहेत.
पथदिवे प्रकाशमय करण्याचा शुभारंभ नुकताच झाला. या वेळी रेवदंडा ग्रामपंचायत सरपंच मनीषा चुनेकर, उपसरपंच मंदाताई बळी, ग्रा. पं. सदस्य राजन वाडकर, खलिल तांडेल, संदीप खोत, माणिक बळी, गजानन धंबा, जनार्दन कोंडे, नेत्रा पोसणे, गीता भांजीनाखवा, मिलिंद चुनेकर, राजू चुनेकर, शरद वरसोलकर, सरोज वरसोलकर, सलीम गोंडेकर तसेच ग्रामसेवक दिवकर, ग्रा. पं. कर्मचारी सचिन मयेकर, रवी देवकर आदींची उपस्थिती होती.
स्मशानभूमी रस्ता पथदिव्याचा शुभारंभ सरपंच मनीषा चुनेकर, साखळे गल्ली पथदिव्याचा शुभारंभ ग्रा. पं. सदस्य खलिल तांडेल, नवीन वसाहत कोळीवाडा पथदिव्याचा शुभारंभ ग्रा. पं. सदस्य माणिक बळी व रेवदंडा मोठे बंदर जे. टी. पथदिव्याचा शुभारंभ जनार्दन कोंडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून करण्यात आला. रेवदंडा ग्रामपंचायतीच्या वतीने या नूतन ठिकाणी पथदिव्यांची उपलब्धता करून रस्ते प्रकाशमय केल्यामुळे स्थानिक रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.