Breaking News

100 ट्रीलीयन डॉलरमध्ये पडले जगाचे प्रतिबिंब!

जगातील भांडवली बाजारांचे एकूण मूल्य प्रथमच विक्रमी 100.5 ट्रीलीयन डॉलर म्हणजे सात हजार 400 लाख कोटी रुपये एवढे प्रचंड झाले आहे. या बाजारमूल्यात गेल्या काही वर्षांत झालेल्या आणि नजीकच्या भविष्यात होऊ घातलेल्या बदलांचे प्रतिबिंब दडले आहे. या सर्वव्यापी बदलांकडे आपण कसे पाहणार आहोत? सर्व जगातील अर्थव्यवस्था संघटीत होते आहे आणि तिचा वेग तंत्रज्ञानामुळे गेल्या काही दशकात प्रचंड वाढला आहे, हे आपण जाणतोच. पण त्याचा पुरावाच आता जगातील भांडवली बाजारांनी दिला आहे. ही प्रक्रिया केवळ प्रगत देशांपुरतीच मर्यादित असती, तर गेल्या शतकात आपण जसे, अशा अनेक प्रकारच्या आर्थिक आकडेवारीकडे दुर्लक्ष करू शकत होतो, तसे या वेळीही त्याकडे दुर्लक्ष केले असते. कारण गेल्या शतकात आपला या आकड्यांशी काही संबंधच येत नव्हता. पण या शतकात ज्या ज्या गोष्टी प्रगत जगतात घडत आहेत, त्यांचा आणि आपला थेट संबंध आता प्रस्थापित होऊ लागला आहे. 1991ला म्हणजे तब्बल 28 वर्षांपूर्वी आपण स्वीकारलेल्या जागतिकीकरणाचा हा अपरिहार्य असा परिणाम आहे.

तरलता वाढल्याचा परिणाम

एक आकडेवारी अशी आली आहे की जगभरात जेवढ्या लिस्टेड कंपन्या आहेत, त्यांचे बाजारमूल्य प्रथमच 100.5 ट्रीलीयन डॉलर म्हणजे सात हजार 400 लाख कोटी रुपये एवढे प्रचंड झाले आहे. जगाचा जीडीपी मोजण्याच्या काही प्रचलित पद्धती आहेत, पण त्यात सर्वाधिक एकमत असलेली जी पद्धत आहे, त्यानुसार जगाचा जीडीपी सध्या 150 ट्रीलीयन डॉलरच्या घरात आहे. याचा सरळ अर्थ असा की, त्यातील 100.5 ट्रीलीयन डॉलर संपत्ती भांडवली बाजारातील आहे. कोरोनाच्या संकटामुळे भारतासह जगातील भांडवली बाजार मार्च महिन्यात कोसळले. त्यावेळी हे बाजार मूल्य घसरून 61.6 ट्रीलीयन डॉलर इतके झाले आणि हे संकट कमी होण्याची शक्यता निर्माण झाली की त्यात गेल्या चार-पाच महिन्यात विक्रमी म्हणजे तब्बल 63 टक्के वाढ झाली.कोरोनामुळे जगात आर्थिक पेचप्रसंग निर्माण होऊ नये म्हणून सरकारांनी आपापल्या देशांच्या व्यवस्थेमध्ये पैसा ओतला. त्यामुळे तरलता वाढली आणि फिरत फिरत हा पैसा शेअर बाजारांमध्ये उतरला. त्याचा हा परिणाम आहे.

-सर्वाधिक वाटा अमेरिकेचा

भांडवली बाजारातील 100.5 ट्रीलीयन डॉलर पैसा म्हणजे नेमका किती पैसा, हे समजून घेतले पाहिजे. रुपयात तो सात हजार 400 लाख कोटी इतका होतो. जगातील पैसा तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या ओढून घेत आहेत, त्यामुळे या रकमेतील 41.6 ट्रीलीयन डॉलर वाटा एकट्या अमेरिकेचा आहे, याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. फेसबुक, अ‍ॅपल, अमेझॉन, नेटफ्लिस्क, गुगल आणि मायकोसॉफ्ट या तंत्रज्ञान कंपन्यांचे ग्राहक जगभर आहेत. या सर्व कंपन्या अमेरिकी आहेत. त्यामुळे भांडवली बाजारातील रकमेचा सर्वाधिक वाटा अमेरिकेचा आहे. जगाच्या व्यापारात आपले प्रभुत्व गाजविण्यास निघालेल्या चीनचा वाटा यात दुसर्‍या क्रमांकाचा म्हणजे 10.7 ट्रीलीयन डॉलर एवढा आहे. भारताचा यात 10वा क्रमांक असून भारतीय शेअर बाजाराचा वाटा 2.4 ट्रीलीयन डॉलर म्हणजे 180 लाख कोटी डॉलर (5 डिसेंबर रोजीच्या निर्देशांकानुसार) इतका झाला आहे. याचा अर्थ भारताच्या जीडीपीमध्ये संघटीत क्षेत्राचा वाटा वेगाने वाढत चालला आहे. आकडेवारीच्या जंजाळात अधिक न जाता असे म्हणता येईल की असंघटित क्षेत्राचा वाटा जगभर कमी होत असून त्याच वेगाने संघटीत क्षेत्राचा वाटा वाढत चालला आहे. ही आर्थिक विषमता केवळ एखाद दुसर्‍या देशापुरती मर्यादित नाही, ती जगव्यापी आहे.

– सौदीची जागा कॅनडाने का घेतली?

जागतिकीकरणामुळे जग आता असे काही जोडले गेले आहे की त्याचे परिणाम कोणीच टाळू शकत नाही. उदा. भांडवली बाजाराच्या हिस्स्याचा विचार करावयाचा तर सौदी अरेबिया सातव्या क्रमांकावर होता, पण कोरोनामुळे जग थांबले आणि पेट्रोल डिझेलची मागणी कमी झाल्याने इंधनावर अर्थव्यवस्था अवलंबून असलेले देश आर्थिक संकटात सापडले. पण इंधनाचे दर पुन्हा वाढताना दिसत असतानाही तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे मूल्य वाढते आहे आणि इंधन कंपन्यांचे मात्र त्या तुलनेत वाढत नसल्याने जगातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या अरमाको या सौदी कंपनीचे मूल्य न वाढल्याने सौदीची जागा आता कॅनडाने घेतली आहे.

भारतातही आयटी, फोनचा बोलबाला

ही विषमता जशी देशादेशांना लागू आहे, तशी एकाच देशातील क्षेत्रांना लागू आहे, हेही समजून घेतले पाहिजे. उदा. अमेरिकी भांडवल बाजारात अ‍ॅपल कंपनीचे बाजारमूल्य विक्रमी दोन ट्रीलीयन डॉलर एवढे प्रचंड झाले. जग आता फाईव्ह जी तंत्रज्ञानाची प्रतीक्षा करत असून त्यात या कंपनीच्या फोनला मागणी वाढेल, असा अंदाज करून या कंपनीच्या शेअरला मागणी आली आहे. (अ‍ॅपल कंपनीचा एक शेअर सध्या 468.7 डॉलर म्हणजे सुमारे 35 हजार रुपयांना आहे.) गेल्या दोन वर्षांत कोणतेही नवे संशोधन न करता केवळ अ‍ॅपल फोन आणि त्यावर चालणार्‍या अ‍ॅपच्या वापराचे नेटवर्क जगभर वाढवून या कंपनीने यावर्षी 12 टक्के अधिक नफा मिळविला आहे. यावर्षी तिचा नफा सुमारे 70 हजार कोटी रुपये एवढा आहे. केवळ ही कंपनीच नव्हे तर सर्वच तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे बाजारमूल्य सातत्याने वाढते आहे. भारतीय शेअर बाजारातही सर्व आयटी आणि फोनशी संबधित कंपन्यांचे बाजारमूल्य वाढले आहे. उदा. भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्सच्या व्यवहारात जिओ सेवेचा वाटा वाढला आहे तर भारतातील दुसर्‍या क्रमांकाची- टीसीएस ही आयटी क्षेत्रातील कंपनी आहे.

– संयमित वापरच महत्त्वाचा ठरणार

आता या सर्व आकडेवारीकडे आपण कसे पाहायचे? जागतिकीकरण आणि भांडवलशाहीचा हा परिपाक आहे, असेही आपण म्हणू शकतो किंवा नव्या काळातील अपरिहार्य बदल असेही त्याला नाव देऊ शकतो. पण लक्षात घेतले पाहिजे की आपण काहीही म्हटले तरी परिस्थिती बदलत नाही. त्यामुळे परिस्थिती बदलण्याची वाट पहायची की परिस्थितीनुसार आपण बदलायचे, हा विचार केला पाहिजे. हा विचार म्हणजे आपल्याला पेच वाटत असेल तर पुढील काही मुद्दे आपल्याला योग्य विचाराकडे घेऊन जाण्यास मदत करतील. 1. तंत्रज्ञानाचे महत्त्व यापुढील काळात असेच वाढत जाणार आहे. 2. जे तंत्रज्ञान आपल्या समकक्ष स्पर्धकांनी स्वीकारले आहे, ते आपण नाकारू शकत नाही. 3. संपत्तीचा मोठा वाटा यापुढे संघटीत क्षेत्राकडे जाणार असल्याने शेअर बाजारासंबंधित गुंतवणुकीचे महत्त्व वाढणार आहे. 4. जागतिकीकरणानंतर तंत्रज्ञानाच्या अनेक लाटा आल्या आणि त्याच्या स्वीकाराविषयी समाजात वाद झाले, मात्र अंतिमत: तो बदल सर्वांनाचा स्वीकारावा लागला. (उदा. संगणकीकरण, डिजिटल व्यवहार, मोबाइल फोन, ऑनलाइन खरेदी) 5. तंत्रज्ञानाचा विकास हा जागतिक स्पर्धेचा तसेच संरक्षण सिद्धतेचा भाग झाल्याने त्यात मागे राहण्याची जोखीम कोणताही देश घेऊ शकत नाही. 6. या सर्व बदलाचे आपण केवळ साक्षीदार नसून लाभधारक आहोत आणि ज्याला जेव्हा शक्य होते, तेव्हा तो हे बदल आपल्या आयुष्यात स्वीकारून टाकतो, असाच अनुभव आहे. 7. हे बदल जर योग्य नाहीत, अशी कोणी मांडणी करत असेल तर त्याच्या बाजूने उभे राहणार्‍यांची आणि त्यासाठी जगात मोठा राजकीय बदल घडवून आणण्याची क्षमता प्रस्थापित करावी लागेल. 8. तंत्रज्ञानाचा अधिकाधिक लाभ घेणारे आणि ज्यांना ही संधी कोणत्याही कारणाने मिळू शकत नाही, अशा दोन वर्गांतील विषमता नजीकच्या भविष्यात वाढत जाणार आहे. 9. सर्व तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापराचे काही विपरीत परिणाम समाजाला सहन करावे लागणार आहेत. 10. अत्याधुनिक तंत्रज्ञानातील काय स्वीकारायचे आणि त्याचा संयमित वापर कसा करावयाचा, हे ज्यांना कळेल, तेच या बदलाचे खरे लाभधारक ठरतील. त्यासाठी विवेकाने या बदलांचा स्वीकार करणे, हाच समृद्ध आयुष्यातील सर्वात कळीचा मुद्दा ठरणार आहे.

-यमाजी मालकर

………………..* ………………* …………………*…………….* ……………………….

ट्रेडिंगसाठीची शिस्तबद्धता आणि कालावधी

ट्रेडिंग करताना जेवढा फायदा होऊ शकतो, तेवढाच तोटाही. त्यामुळे सर्व व्यवहार करताना शिस्तबद्ध असणे आणि त्या त्या व्यवहाराचा कालावधी काटेकोर सांभाळणे फार महत्त्वाचे ठरते. या दोन दक्षता कशा घ्याव्यात, याविषयी…

शिस्तबद्धता : इंट्रा-डे-ट्रेडिंग व ट्रेडिंग या दोन्ही इंट्रा-डे-ट्रेडिंगशी निगडीत सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सौदेपूर्ती. साधारणपणे प्रत्येक इंट्रा-डे-ट्रेडरला आपले सर्व व्यवहार हे दुपारी 3:15 च्या आत म्हणजेच बाजार बंद होण्याआधी पंधरा मिनिटं स्वतःहून पूर्ण करावेच लागतात अन्यथा ब्रोकरकडून आपोआप ते पूर्ण केले जातात. त्यामुळं अशा व्यवहारांमध्ये मर्यादीत काळ मर्यादा असल्यानं नफ्याचा उद्दिष्टाबरोबरच नुकसानीची गृहीतकं मांडून त्यांचे ठराविक भाव ठरवून ठेवणं जरुरीचं ठरतं, अन्यथा त्या भावाच्या पुढं भाव गेल्यास आपलं नुकसान वाढू शकतं.त्यामुळं या व्यापार म्हणजे ट्रेडिंग व्यवसायात सर्वांत महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे शिस्तबद्ध राहणं. जर आपण या गोष्टीकडं एका व्यवसायीक दृष्टिकोनातून पाहिलं तर नफा नुकसान या एकाच नाण्याच्या दोन गोष्टी आहेत हेदेखील लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यासाठी कधी नफा व कधी नुकसान हे होणारच, हे मान्य केलं पाहिजे.अगदी ढोबळ मनानं संभाव्यता गृहीत धरली तरी आपसूक सहजच बोललं जातं की ती 50-50 असू शकते. परंतु यावर मी एक प्रयोग केला म्हणजे, 100 वेळां एकच नाणं टॉस केलं आणि हेड की टेल हे मोजलं. तर 63 वेळेस पृष्ठ बाजू (हेड) आली तर 37 वेळेस पार्श्व (टेल) बाजू, म्हणजेच वरील 50-50 चे गृहीतक साफ मोडीत निघतं. आता हीच गोष्ट ट्रेडिंगमध्ये गृहीत धरल्यास जर 63 वेळेस आपले व्यवहार तोट्यात गेले आणि केवळ 37 वेळेस आपले व्यवहार फायद्यात राहिले तर आपल्या भांडवलाचे काय होईल, याची कल्पना करा. म्हणूनच शिस्तबद्ध असणं फार गरजेचं ठरतं. त्यामुळं प्रत्येक व्यवहार (ट्रेड) सुरू करताना, म्हणजेच पोझिशन घेताना जसं आपलं उद्दिष्ट किंवा लक्ष्य आपण ठरवलेलं असतं अगदी त्याप्रमाणंच त्या व्यवहारात किती नुकसान आपण सहन करू शकतो, तो भावदेखील ठरवून ठेवावा. शक्यतो आपला उद्दिष्ट भाव (टार्गेट) हे नुकसान थांबवणार्‍या भावाच्या (स्टॉप लॉस) च्या दुप्पट असावं. म्हणजेच वरील उदाहरणाप्रमाणं जरी 63 वेळा आपले व्यवहार नुकसानीत गेले आणि प्रत्येक वेळेस जरी एक रुपयांचा तोटा गृहीत धरला तरी एकूण नुकसान हे 63 असू शकेल आणि नफ्याच्या प्रत्येक व्यवहारात जर दोन रुपयांचा फायदा (तोट्याच्या दुप्पट) गृहीत धरला तरी एकूण व्यवहारात 74 रुपयांचा फायदा होऊ शकेल. म्हणजेच एकूणच 100 व्यवहारांत 63 वेळेस नुकसान सहन करून सुद्धा आपण नफ्यात राहू शकतो.अजून एक व्यवहारिक उदा. म्हणजे, एखाद्या ट्रेडरनं एका कंपनीचे काही शेअर्स 500 रुपयाला खरेदी केलेले असतील आणि त्याचं विक्रीचं उद्दिष्ट 520 असल्यास त्याची नुकसान सहन करण्याची तयारी दोन टक्के (10) असावयास हवी असेल तर त्याचा नुकसान थांबवण्याचा भाव होऊ शकतो, 490(500-10). म्हणजे त्या शेअर्सचा भाव त्यानंतर कितीही खाली घसरला तरी त्या व्यक्तीचं नुकसान प्रतिशेअर केवळ 10 रुपयेच असू शकेल.परंतु बहुतांश शेअर ट्रेडर्स हे नफा आपल्या लक्ष्याच्या आधीच पदरात पाडताना दिसून येतात आणि नुकसानीत स्टॉप लॉस भावात नुकसान न स्वीकारता पुन्हा व्यवहार फायद्यात येण्याची वाट पाहतात आणि सरतेशेवटी मोठं नुकसान वाट्याला घेतात. 

कालावधी : गुंतवणुकीच्या कालावधीस तितकसं महत्त्व नसतं तर मिळणारा नफा हा महत्त्वाचा असतो परंतु ट्रेडिंगच्या बाबतीत महत्त्व हे वेळेस असतं. गुंतवणूकीचं रूपांतर हळूहळू संपत्तीमध्ये होतं, तर ट्रेडिंगमध्ये आपण शेअर्स विशिष्ट अवधीसाठी घेतो व विकून टाकतो. यात ढोबळमानानं, स्कालपिंग (काही सेकंड ते काही मिनिटं), इंट्रा-डेट्रेडिंग म्हणजे एका दिवसापुरतं ट्रेडिंग, स्विंगट्रेडिंग म्हणजे दोन दिवसांपासून ते एका आठवड्यापर्यंतचं व पोझिशनल ट्रेडिंगचा कालावधी साधारण एक आठवडा ते काही महिने असू शकतो. याबद्दल अधिक विस्तृतपणे आणि डे-ट्रेडिंगसाठी आवश्यक गोष्टी व त्यात टाळत्या येणार्‍या चुकांविषयी यापुढील लेखांत..

सुपर शेअर – गेल आणि तेल कंपन्या

आठवड्याअखेर कच्च्या तेलाच्या किंमतींनी उर्ध्व दिशेस प्रवास वाढविल्यामुळे सरकारी-तेल-गॅस कंपन्यांच्या शेअर्सनी तेजी नोंदवली. ऑईल अ‍ॅण्ड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशन व गॅस अ‍ॅथॉरिटीच्या शेअर्सनी उसळी मारली. कोविड-19 वरील लस येण्याच्या आशेवर मागणी सुधारल्यामुळं जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत गुरुवारी मार्चनंतर प्रथमच प्रति बॅरल 50 अमेरिकी डॉलरच्यावर गेली आणि त्याचा परिणाम या देशी कंपन्यांच्या शेअर्समधील तेजीत झाला. या ऐतिहासिक वर्षाच्या शेवटच्या बैठकीत पेट्रोलियम निर्यात देशांच्या संघटनेने (ओपेक) संघर्षशील जागतिक तेल बाजाराला संतुलित ठेवण्यासाठी देखरेख वाढविण्याचा निर्णय घेतला. या समूहाने जानेवारी 2021 पासून दोन लाख बॅरल्स प्रतिदिन ते 57 लक्ष बॅरल्स प्रतिदिन अशा नियोजित कपातीच्या तुलनेत अर्धा दशलक्ष बॅरल्स प्रतिदिन ते 72 लक्ष बॅरल्स प्रतिदिन कपातीचा निर्णय घेतल्यानं पुरवठा कमी झाल्यास तेलाच्या किमतींमधील घसरण आटोक्यात राहून किंमती स्थिर राहिल्यानं पुढील दिवसांत मागणी वाढल्यास किंमती सुधारू शकतील. मागील आठवड्यात गॅस अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (गेल) कंपनीच्या शेअरचा भाव मागील आठवड्यात 25 टक्क्यांहून अधिक वाढला. मागील दोनच महिन्यांत ह्या कंपनीचा शेअरभाव 81 रुपयांवरून 129 रुपयांवर पोहचला आहे (117 टक्के वाढ). दैनिक आलेखावर अजूनही, 140 रुपयांचा स्तर गाठण्याची शक्यता वाटत असून आजमितीस पुनर्खरेदीसाठी 100 रुपयांवर आधार संभवू शकतो.

-प्रसाद ल. भावे

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply