Breaking News

हिंसेचा बंगाली वारसा

पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होतील. त्याच्यासाठी रणमैदान आतापासूनच तापू लागले आहे. जनतेकडे जाऊन मते मागण्याचा प्रत्येक राजकीय पक्षाला लोकशाही व्यवस्थेत अधिकार असतो. विचारसरणीची लढाई ही लोकशाही मार्गानेच लढायची असते. परंतु बंगालमधील परिस्थिती त्याच्या नेमकी उलट आहे.

साहित्य, कला आणि संस्कृती यांचे वरदान लाभलेल्या बंगालच्या भूमीला राजकीय हिंसाचाराचा शापच आहे असे इतिहासाची पाने चाळताना दिसून येते. रवींद्रनाथ टागोर, शरच्चंद्र, बंकिमचंद्र आणि सत्यजित राय यांसारख्या प्रतिभावंतांची ही वंगभूमी राजकारणाचा रंग चढला की हिंसाचाराने दुमदुमून जाते. अनेक दशके कम्युनिस्टांच्या राजवटीत बंगालच्या जनतेने हेच अनुभवले. माओवादी, आनंदमार्गी या चळवळींमधील हिंसक गटांनी केलेला हिंसाचार आधुनिक बंगालच्या इतिहासात नोंदवलेला आढळतो. कम्युनिस्ट राजवटीचा पाडाव करून तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी गेले दशकभर पश्चिम बंगालवर सत्ता गाजवली आहे. परंतु राजकीय हिंसाचाराचा हा शाप काही त्यांना पुसून टाकता आला नाही. उलटपक्षी, राजकीय हिंसाचाराचा हाच वारसा त्यांनी पुढे चालवला असे दुर्दैवाने म्हणावे लागते. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी नुकताच बंगालचा दौरा केला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन भाजपचा आवाज बुलंद केला. डायमंड हार्बर येथे कार्यक्रमासाठी ते निघाले असताना त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर तृणमूलच्या गुंडांनी तुफान दगडफेक केली. जवळपास 50हून अधिक मोटारींच्या काचांचा चक्काचूर झाला. भाजपचे किमान आठ कार्यकर्ते जबर जखमी झाले. भाजपचे बंगालमधील निवडणूक प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांचा डावा हात फ्रॅक्चर झाला व खुद्द भाजप अध्यक्ष नड्डा बुलेटप्रुफ मोटारीमुळे थोडक्यात बचावले. विशेष म्हणजे बंगाल राज्य पोलिसांच्या डोळ्यांदेखत हा भयंकर हिंसाचार घडत होता. त्याहूनही संताप आणणारी बाब म्हणजे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बेदरकारपणे यासंदर्भात केलेली वक्तव्ये. भाजप अध्यक्षांच्या मोटारींच्या ताफ्यावर झालेला हल्ला ही भाजपवाल्यांचीच नौटंकी आहे, असे त्या म्हणाल्या. त्यांनी भाजप नेते जे. पी. नड्डा यांच्याबाबत आणखी बरीच आक्षेपार्ह विधाने केली, त्याचा पुनरुच्चार करणेदेखील अशक्य आहे. पश्चिम बंगालमध्ये दिवसेंदिवस भारतीय जनता पक्षाचा जनाधार वाढत चालला आहे. त्यामुळे तृणमूलचे नेते व खुद्द ममता बॅनर्जी यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे ही वस्तुस्थिती आहे. भ्रष्टाचार, घोटाळे, खंडणीखोरी अशा अनेक कारणांमुळे तृणमूल काँग्रेसच्या राजवटीला बंगालची जनता कंटाळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेली विकासाची गंगा बंगालच्या भूमीतूनदेखील वाहावी, असे तेथील जनतेला वाटते. परंतु दुराग्रही स्वभावाच्या ममता बॅनर्जींमुळे पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेले अनेक विकास कार्यक्रम पश्चिम बंगालपर्यंत आजवर पोहचलेच नाहीत. साहजिकच ममता राजवटीला कंटाळलेल्या जनतेने भाजपचा विकासाचा कार्यक्रम आपलासा केला तर त्यात अयोग्य काय? तथापि, भाजपच्या वाढत्या जनाधारामुळे अस्वस्थ झालेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारतीय घटनेलाच गुंडाळून ठेवून राजकीय हिंसाचाराचा दुर्दैवी मार्ग चोखाळलेला दिसतो. याची जबरदस्त किंमत त्यांना पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीमध्ये मोजावी लागेल. बंगालमध्ये आगामी निवडणुकीत 200हून अधिक जागा मिळवण्याचा इरादा भाजप अध्यक्ष नड्डा यांनी जाहीर केला आहे. तो नक्कीच तडीला जाईल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

Check Also

पनवेल ग्रामीण भागातील रस्त्यांचा होणार विकास

50 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल …

Leave a Reply