ग्रामीण भागात कडाक्याची थंडी; परभणी ऽ 5.6
मुंबई ः प्रतिनिधी
देशात मागील बर्याच दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यातही बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा खाली आला आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आदी उत्तरेकडील राज्यांमध्ये शीतलहर आल्यामुळे इकडे महाराष्ट्रही गारठला आहे.
राज्यात गेल्या दोन दिवसांत ग्रामीण भागात हाडे गोठवणारी थंडी पडली आहे. परभणीमध्ये 5.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. हे तापमान यंदाच्या हिवाळ्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक नीचांकी आकडा दर्शवते. इतर ठिकाणीही पारा घसरला असून, कडाक्याच्या थंडीत शेकोट्या पेटू लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
दरम्यान, कडधान्य पिकांसाठी ही थंडी उपयुक्त आहे. त्यामुळे हा गारवा पिकांसाठी फायद्याचा ठरणार आहे.
मुंबईतही हुडहुडी
उत्तर महाराष्ट्र पूर्णपणे गारठला असून, आता देश आणि राज्यातील थंडीच्या लाटेचे परिणाम मुंबईतही पाहायला मिळत आहेत. मुंबईतील तापमान आणखी कमी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडूनही देण्यात आला आहे. त्यामुळे नाताळ, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनाही गुलाबी थंडीचा आनंद घेता येणार आहे.
दरम्यान, कोरोनाचा धोका पाहता थंडीच्या दिवसांमध्ये नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.