…तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत : अॅड. बी. जी. कोळसे-पाटील
नागोठणे : प्रतिनिधी – मृताच्या कुटुंबियांची परवानगी घेऊनच पोलिसांच्या सल्ल्यानुसार मृतदेह शवागृहात ठेवण्यासाठी पनवेलला स्वतः घेऊन जात आहे. आमच्या लेखी मागण्या रास्त असून रिलायन्स कंपनी जोपर्यंत ऐकत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, असे लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. जी. कोळसे पाटील यांनी येथे स्पष्ट केले.
नागोठणे येथील रिलायन्स कंपनीच्या विरोधात लोकशासनच्या वतीने 27 नोव्हेंबरपासून प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. सोमवारी (दि. 21) दुपारी जगदीश वारगुडे या आंदोलनकर्त्या तरुणाचे निधन झाले. त्याचा मृतदेह रात्री उशिरा आंदोलनस्थळी आणण्यात येऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या वेळी न्या. कोळसे पाटील प्रतिक्रिया व्यक्त करीत होते.अंबानी अजून किती जणांचा बळी घेणार आहेत असा सवाल व्यक्त करताना, सरकारला शरम वाटत असेल तर त्यांनी राजधर्म निभावतानाच नागोठण्यातील आंदोलनाकडेसुद्धा लक्ष द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आंदोलनात तीन हजार महिला सहभागी झाल्या असल्या तरी जिल्हाधिकारी बाईंनी येथे येण्याचे सौजन्य दाखवले नसल्याची खंत कोळसे पाटील यांनी व्यक्त केली. त्यानंतर सोमवारी रात्री शववाहिकेबरोबर ते पनवेलकडे रवाना झाले. दरम्यान, रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने सोमवारी सायंकाळी या ठिकाणी भेट देऊन गेले.
ही आरपारची लढाई असून निर्णय झाल्याशिवाय वारगुडे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नसल्याचे संघटनेचे राष्ट्रीय संघटक राजेंद्र गायकवाड यांनीही मंगळवारी (दि. 22) सकाळी स्पष्ट केले. वारगुडे यांचा लहान भाऊ सध्या आसाम येथे भारतीय सैन्यात कार्यरत आहे. त्यांची तसेच आई, वडील आणि बहिणीची परवानगी घेऊनच मृतदेह पनवेल येथे शवागृहात ठेवण्यात आला आहे.
संघटनेचे स्थानिक सरचिटणीस गंगाराम मिणमिणे यांच्या म्हणण्यानुसार वामन पाटील आणि उमाजी घासे हे दोन वृद्ध पहिल्या दिवसांपासून आंदोलनस्थळी उपस्थित होते. त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने ते तसेच ताई घासे ही वृध्द आंदोलनकर्ती रुग्णालयात उपचार घेत आहे. जगदीश वारगुडे याच्या अकाली मृत्यूमुळे आंदोलनकर्त्यांमध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी सकाळी व रात्री येथे कोणीही
भोजन केले नसल्याचे मिणमिणे यांनी सांगितले.
मृत जगदीश वारगुडे याचे आई, वडील तसेच बहिण सोमवारपासून आंदोलनस्थळी उपस्थित असून त्याच्या आईची तब्येत बिघडल्याने काही महिला कार्यकर्त्या त्यांना सकाळी नागोठणेतील रुग्णालयात घेऊन गेल्या असल्याची माहिती मिणमिणे यांनी या वेळी दिली.
जगदीश वारगुडे या आंदोलनकर्त्याच्या अकाली मृत्यूला रिलायन्सचे व्यवस्थापनच जबाबदार असून, या प्रकरणी काही वरिष्ठ अधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संघटनेमार्फत करण्यात येईल.
-गंगाराम मिणमिणे, स्थानिक सरचिटणीस, लोकशासन आंदोलन संघर्ष समिती