अलिबाग : प्रतिनिधी
नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यात येणार्या पर्यटकांचे स्वागत आहे. मात्र इथे येऊन रेव्ह पार्ट्या केल्यात तर संबधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी दिला आहे. ते अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. नववर्ष स्वागतासाठी दरवर्षी हजारो पर्यटक रायगड जिल्ह्यात दाखल होतात. मात्र यावर्षी करोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने नववर्ष स्वागत समारोह साधेपणाने साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. हॉटेल व रिसॉर्टमधील सांस्कृतीक कार्यक्रमांच्या आयोजनाला शासनाच्या सुधारीत आदेशानुसार निर्बंध घालण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात दाखल होणार्या पर्यटकांची नऊ चेक पोस्टवर तपासणी केली जाणार आहे. या आरोग्य तपासणीनंतर त्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार आहे. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचार बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळी कोणी बाहेर पडू नये, घरात अथवा हॉटेलमध्ये राहून सर्वांनी साधेपणाने नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. समुद्र किनार्यांकडे जाणार्या मार्गावर अतिरीक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्रशान करणार्यांवर, तसेच मद्यप्राशन करून गाडी चालविणार्यांवर कारवाई केली जाणार आहे. हॉटेल्स आणि रिसॉर्टवर पोलीसांची नजर असणार आहे. त्याच बरोबर रेव्ह पार्ट्यांचे आयोजन केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. वाहतूक नियमनासाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख मार्गांवर जादा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक दुधे यांनी पत्रकार परिषदेत दिली.