एकाचा होरपळून मृत्यू, एक गंभीर जखमी
खालापूर, मोहोपाडा : प्रतिनिधी
रसायनीमधील मोहोपाडा येथील दुकानाला आज पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत दोघेजण होरपळले. त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मोहोपाडा येथील मरिआई मंदिराजवळ एका दुकानाच्या गाळ्यात कापसाचे गोडावून आहे. या गोडावूनमध्ये गोपाळ कुमार पंचानन चक्रवर्ती (30) आणि गणेश हनुमंत राऊत हे दोघे झोपले होते. शुक्रवारी (दि. 1) पहाटेच्या सुमारास गोडावूनमधील कापसाला आग लागली. या आगीत गोपाळ आणि गणेश होरपळले. त्यात गोपाळचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी गणेश आरडाओरड केल्याने आसपासचे ग्रामस्थ जागे झाले. त्यांनी संपर्क केल्यानंतर रसायनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक सुजाता तानवडे यांनी एमआयडीसी अग्निशमन दलाला पाचारण करून घटनास्थळी धाव घेतली. या आगीत गंभीर जखमी झालेल्या गणेश राऊत याला नावडे येथील स्वास्था हॉस्पिटलात दाखल करण्यात आले आहे. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी सुधीर कुमार पंचानन चक्रवर्ती (50) याने दिलेल्या फिर्यादीनुसार रसायनी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.