Breaking News

‘…तर माणगाव नगरपंचायत निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार’

माणगाव : प्रतिनिधी

येथील नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत  महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या नेत्यांनी आम्हांला  सन्मानपूर्वक जागा दिल्या नाही, तर ही निवडणूक आम्ही स्वबळावर लढवू, असे काँग्रेस (आय) चे रायगड जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार (माणगाव) यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना सांगितले.

माणगाव नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 2021 मध्ये होणार आहे. या निवडणुकीबाबत बोलताना ज्ञानदेव पवार पुढे म्हणाले की, माणगाव शहरात तसेच तालुक्यात आजही काँगेस (आय) पक्षाची ताकद मोठी आहे. स्व. बॅ. ए. आर. अंतुले साहेबांना मानणारा मोठा वर्ग  आहे. आमची ताकद येणार्‍या माणगाव नगरपंचायत निवडणुकीत आम्ही नक्कीच दाखवून देऊ.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. ही निवडणूक महाविकास आघाडीमार्फत लढविण्यास आम्ही उत्सुक आहोत. आम्ही वेळोवेळी आघाडीचा धर्म पाळला आहे. मात्र आम्हाला मित्रपक्षांची कधीच साथ मिळत नाही. माणगाव नगरपंचायत निवडणुकीबाबत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या नेत्यांनी अद्याप आमच्याशी साधी चर्चादेखील केलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी माणगाव नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस (आय) पक्षाला 17 पैकी किमान 5 ते 6 जागा दिल्या पाहिजेत. आम्हाला सन्मानपूर्वक जागा मिळाल्यास आम्ही महाविकास आघाडीसोबत राहू. मात्र मित्रपक्ष आमच्यावर अन्याय करणार असतील तर आम्ही ही निवडणूक स्वबळावर लढणार असून नगरपंचायत हद्दीतील सर्व 17 वार्डांतून उमेदवार उभे करणार असल्याचे ज्ञानदेव पवार यांनी स्पष्ट केले.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply