Breaking News

अत्याचारी नराधमाला ‘शक्ती कायद्या’द्वारे 21 दिवसांत फाशी द्या

शूरनारी प्रतिष्ठानतर्फे  ट्विटर मोहिमेद्वारे मागणी; नागोठणे पोलीस ठाण्यात दिले निवेदन

नागोठणे : प्रतिनिधी

पेण तालुक्यातील पांचोळा आदिवासी वाडीवरील तीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करणार्‍या नराधमाला ’शक्ती कायद्या’द्वारे 21 दिवसात फाशी देण्याची मागणी येथील शूरनारी प्रतिष्ठानच्या वतीने 31 डिसेंबर रोजी ट्वीटर मोहिमेद्वारे करण्यात आली असून तसे निवेदन  शुक्रवारी (दि. 1) नागोठणे पोलीस ठाण्यात देण्यात आले.

पेण येथील पांचोळा आदिवासीवाडीमधील तीन वर्षांच्या चिमुरडीवर 30 डिसेंबर 2020 रोजी बलात्कार करून तिची निर्दयपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपी नराधम आदेश पाटील यास पोलिसांनी अटक केली आहे. नागोठण्यातील शूरनारी प्रतिष्ठानच्या वतीने 31 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच ते सात दरम्यान ट्वीटर मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये  पांचोळा-पेण येथील आदिवासी कुटुंबातील या लहान मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणार्‍या नराधमाला ’शक्ती कायद्या’द्वारे 21 दिवसात फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. तसेच याबाबत शुक्रवारी नागोठणे पोलीस ठाण्याचे निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

 नराधमाकडून करण्यात आलेल्या बलात्कारात आदिवासी कुटुंबातील लहान मुलीला जीव गमवावा लागला. असे अमानवी कृत्य करणारे विकृत समाजात असणे, हे समाजासाठी घातक आहे. सतत घडणार्‍या या घटना रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्याच्या प्रतिमेला काळिमा फासणार्‍या आहेत. या घटनांना योग्य कायद्याद्वारे प्रतिबंध बसणे, गरजेचे आहे. यासाठीच या नराधमाला ’शक्ती कायद्या’द्वारे फाशीची शिक्षा व्हावी, जेणेकरून अशा विकृत कृत्यांना आणि विचारांना आळा बसेल, असे या निवेदनात म्हटले असून याची प्रत मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पाठविण्यात आली आहे.

प्रतिष्ठानचे संस्थापक ऋत्विज माने, अध्यक्ष आशिष वाळंज, सचिव मंदार इंद्रे यांच्या उपस्थितीत नागोठणे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्याकडे शुक्रवारी निवेदन देण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा महिला दक्षता कमिटी सदस्य कल्पना टके, भाजपा विभागीय महिला अध्यक्षा श्रेया कुंटे, भाजपा शहर सरचिटणीस सोनाली पडवळ, उत्तर भारतीय सेल शहर अध्यक्षा सोनी पांडे, नम्रता माने शिवसेना पेण तालुका विधानसभा संघटिका दर्शना जवके यांच्यासह प्रतिष्ठानचे संकल्प माने, साक्षी खरीवले, ऋतुजा खांडेकर, गीता कुथे, जानवी गोळे आदी उपस्थित होते.

नराधम आदेश पाटील याला पोलीस कोठडी

पेण : प्रतिनिधी

येथील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणारा नराधम आरोपी आदेश पाटील याला अलिबाग सत्र न्यायालयाने 8 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पेण येथील पांचोळा आदिवासीवाडीमधील तीन वर्षांच्या चिमुरडीवर 30 डिसेंबर 2020 रोजी बलात्कार करून तिची निर्दयपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला. आरोपी आदेश पाटील यास पोलिसांनी तातडीने अटक करून गुरुवारी (दि, 31) अलिबाग येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 8 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे आरोपीच्या बाजूने कोणीही वकील हजर झाला नाही.

या घटनेचा पेणच्या नागरिकांनी निषेध करीत, अती जलद न्यायालयात हा खटला चालवून आरोपीस फाशी देण्याची मागणी केली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply