Breaking News

दुर्दैवी राडा

स्वर्गीय बाळासाहेबांच्या अकराव्या स्मृतिदिनी त्यांचे विचार, त्यांच्या आठवणी आणि त्यांची शिकवण यांचे स्मरण व्हायला हवे होते, परंतु दुर्दैवाने याच्या अगदी उलट घडले. ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला शिवतीर्थावर जो धिंगाणा घातला, तो निंदनीय होता.

महाराष्ट्राचे दैवत हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या अकराव्या स्मृतीदिनाला खरे तर राज्यभर काही विधायक उपक्रम अथवा कार्यक्रम झाले असते तर ते खचितच शोभून दिसले असते. स्व. बाळासाहेबांनी मराठी माणसाला अस्मितेचे वरदान दिले. ताठ मानेने संकटांशी झुंजण्याची प्रेरणा दिली. मराठी माणसावर होणार्‍या अन्यायाला कडाडून वाचा फोडली. स्व. बाळासाहेबांचे हे ऋण कुठल्याही मराठी माणसाला विसरता येणे शक्य नाही. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण असे त्यांचे समीकरण होते. त्यानुसारच ते आयुष्यभर वागले. स्व. बाळासाहेबांना खोटेपणाची चीड होती. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचे ते शेलक्या शब्दांत वाभाडे काढत, कारण लांगुलचालनाचे राजकारण त्यांना मनस्वी चीड आणत असे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते शरद पवार यांच्याशी त्यांचे अधूनमधून राजकीय दोन हात होत असत, पण वैयक्तिक कटुता किंचितही नसे. किंबहुना, बाळासाहेबांना राजकारणाच्या पलिकडे जाऊन नातेसंबंध जपण्याची अलौकिक देणगीच होती. दुर्दैवाने त्यांच्या पश्चात हे सारेच धुळीला मिळाले. काँग्रेससोबत जायची वेळ आली तर मी माझे दुकान बंद करीन असे ते म्हणत असत, पण त्यांच्या पश्चात खुर्चीच्या लालसेपायी त्यांचा पक्ष काँग्रेसच्या मांडीवरच जाऊन बसला. बाळासाहेबांची तत्त्वे आणि त्यांचे विचार खुंटीवर टांगले गेले म्हणूनच त्यांनी स्थापलेल्या पक्षाची पडझड झाली. बाळासाहेबांनी ज्यांना आपले उत्तराधिकारी म्हणून नेमले होते, त्यांनीच खुर्चीसाठी सारे काही दावणीला बांधावे हे दुर्दैवच. सुदैवाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा धाडसी शिवसैनिक खंबीरपणे उभा राहिला म्हणूनच शिवसेना टिकली. स्मृतिदिनाच्या पवित्र दिवशी वादविवादाचे गालबोट नको या परिपक्व विचारनिशीच मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी गुरुवारी संध्याकाळी शिवतीर्थावर जाऊन स्व. बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर मस्तक टेकवले. त्यांच्यासोबत त्यांच्या गटातील अनेक नेते, आमदार व पदाधिकारी होते. मुख्यमंत्र्यांच्या या शिवाजी पार्क भेटीनंतर ठाकरे गटाचे काही नेते घोषणा देत तेथे जमले आणि अर्वाच्च शिविगाळ करीत स्मृतिस्थळावर गोमूत्र शिंपडण्याचा नस्ता उद्योग त्यांनी केला. या वेळेस तेथे असंख्य महिलादेखील उपस्थित होत्या. तरीही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी घोषणा देताना जी भाषा वापरली, तिचा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे. शिवतीर्थाचे ‘शिवीतीर्थ’ झाले अशी कडवट प्रतिक्रिया समाजमाध्यमांमध्ये उमटली ती काही उगाच नव्हे. बाळासाहेबांची शिवसेना ही मराठी माणसांची लढाऊ संघटना होती व अजूनही आहे, परंतु ठाकरे गटाने शिवतीर्थावर जो तमाशा केला त्याला लढाऊपणा म्हणत नाहीत. आपल्या परमदैवताच्या स्मृतिस्थळाशीच आपण आक्षेपार्ह वर्तन करीत आहोत याचे भानही त्यांना राहिले नाही. या प्रकाराचे उर्मट समर्थन ठाकरे गटाचे नेते आणि प्रवक्ते पुढला संबंध दिवस करीत राहिले. मुख्यमंत्री शिंदे यांचे वर्तन मात्र परिपक्व नेत्यासारखे होते. मनात आणले असते तर ते स्मृतिदिनी शिवाजी पार्क येथे सहज जाऊ शकले असते, पण वाद नको म्हणून त्यांनी आदल्या दिवशी जाणे पसंत केले. तरीही ठाकरे गटाने आपली पातळी दाखवलीच. स्मृतिदिनाच्या पवित्र दिवशी झालेला हा राडा दुर्दैवीच म्हटला पाहिजे.

Check Also

पनवेलमधील विजेचा प्रश्न निकाली

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दोन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील छत्रपती …

Leave a Reply