12 प्रवासी जखमी
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी
ब्रेक निकामी झाल्याने एका खाजगी प्रवासी बसने रविवारी (दि. 10) पहाटे ट्रकला जोरदार धडक दिली. मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटातील ढेकू गावाच्या हद्दीत झालेल्या या अपघातात 12 प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर खोपोलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार करण्यात आले.
‘वैभव ट्रॅव्हल्स‘ ची ही बस 49 प्रवाशांना घेवून द्रुतगती महामार्गावरून विरार मुबंईकडे जात होती. बोरघाटातील ढेकू गावाच्या हद्दीत बसचे ब्रेक निकामे झाले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटूनबसने समोरील ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील 10 प्रवासी किरकोळ तर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. गंभीर जखमींना पवना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, किरकोळ जखमींवर खोपोलीच्या डॉ. आंबेडकर रुग्णालयात उपचार करण्यात आले.
अपघाताचे वृत्त समजताच बोरघाट पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग, अपघात ग्रस्त टीमचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठवून दिले. या अपघातची नोंद खोपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.