Breaking News

बेकायदेशीर वाळू उपशाने नागोठणेतील शेतकरी संतप्त

जिल्हाधिकार्‍यांचे वेधणार लक्ष

नागोठणे : प्रतिनिधी

अंबा नदीच्या जांभूळटेप भागातील खाडीतून बेकायदेशीररित्या वाळूचा मोठ्या प्रमाणावर उपसा केला जात आहे. त्यामुळे खारबंदिस्तीला खांडी पडून खारे पाणी शेतात येते व शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थ हिराचंद गदमले, दामोदर भोईर, किरण भोईर, महादेव भोईर, लहू भोईर, केशव भोईर, कल्पेश भोईर आदींसह इतर ग्रामस्थांनी निवेदन तयार केले असून लवकरच ते रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना देवून त्यांचे लक्ष वेधणार आहेत.

वाळू माफियांनी सध्या नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जांभुळटेप गावाच्या परिसरात अंबा नदी किनार्‍यालगत वाळू उपसण्याचा सपाटा लावला आहे. नोव्हेंबर 2020पासून ही वाळू उपसली जात असून एका दिवसात आठ ते दहा मोठ्या होड्या यासाठी कार्यरत आहेत. होडीत वाळू भरल्यानंतर नदीच्या पूर्व बाजूला वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कर्णाली बंदरात वाळू उतरवून ती पुढे ट्रॅक्टरने इच्छित स्थळी पोहोचविण्यात येत असते.

नदीच्या पश्चिम बाजूला बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याने जांभूळटेप गावातील खारबंदिस्तीला खांडी जावून भातशेती तसेच कडधान्यांची पिके धोक्यात येत आहेत. या प्रकारामुळे जवळपास 20 टक्के पिकती जमीन नापीक झाली असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. शेतीवरच आमची गुजराण असल्याने या रेतीमाफियांनी आवर घालण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांचे लक्ष वेधणार असल्याचे या शेतकर्‍यांनी सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply