Breaking News

कोरोनावरील भारतीय लशींना जगभरातून मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीच्या आपतकालीन वापराला परवानगी देण्यात आल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. जगातील अनेक देशांनी भारताकडे या संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या लसीची मागणी केली आहे.
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून भारताने ब्राझिलला अ‍ॅस्ट्रॉझेनेकाच्या लसीचा तत्काळ पुरवठा करावा, अशी मागणी बोलसोनारो यांनी केली आहे, मात्र भारताने कोरोनासंदर्भात जे धोरण तयार केले आहे त्यानुसार सर्वांत आधी भारत आपल्या शेजारच्या देशांना कोरोनाची लस देणार आहे. त्यानंतर जगभरातील इतर देशांमध्ये कोरोनाची लस पाठवली जाणार आहे.
भारताने कोरोना लसीच्या आपतकालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर ब्राझील, मोरक्को, सौदी अरेबिया, म्यानमार, बांगलादेश, दक्षिण आफ्रिकासारख्या देशांनी भारताकडे कोरोनाच्या लशीची मागणी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत इतर देशांना कोरोनाच्या लशीचा पुरवठा करताना शेजारी देशांना प्रथम प्राधान्य देणार आहे. त्यामुळेच बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका आणि अफगाणिस्तानसारख्या देशांना भारत आधी लशींचा पुरवठा केला जाणार असल्याचे वृत्त आहे.
भारतीय लसींचा दर्जा, गुणवत्ता आणि परिणामकारकता पाहता जगभरातून या लशींना मागणी वाढल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळेच या पूर्णपणे मेड इन इंडिया लशींचे जगभरात वितरण करण्यासाठी भारत सज्ज झाला असून, भारतातील लसीकरणाच्या पहिल्या काही टप्प्यांनंतर या लशींच्या निर्यातीसंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच भारत हा कोरोना लसीकरणामध्ये जागतिक केंद्र होण्याची शक्यता आहे.
चीनकडूनही कौतुक
भारतीय बनावटीच्या करोना लशींचे चीननेही कौतुक केले आहे. दक्ष्णि आशियातील आमच्या शेजारच्या देशाने तयार केलेली कोरोना लस ही गुणवत्तेच्या बाबतीत कोणत्याही लशीपेक्षा कमी नाही, असे चीनने म्हटले आहे. चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या ग्लोबल टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या लेखात भारतामध्ये तयार करण्यात आलेल्या कोरोनाच्या लसी या चीनच्या कोरोना लशीइतक्याच प्रभावी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संशोधन आणि निर्मितीच्या क्षेत्रामध्ये भारताच्या कोरोना लशी या उत्तम असल्याचेही या लेखात म्हटले आहे.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply