उरण : रामप्रहर वृत्त
लोकनेते व प्रकल्पग्रस्तांचे श्रद्धास्थान स्व. दि. बा. पाटील यांच्या 95व्या जयंतीचे औचित्य साधून वहाळ येथील श्री गोरक्षनाथ मंदिर येथे रविवारी (दि. 10) कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र पाटील यांच्या वतीने भव्य कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकांत मढवी यांनी प्रास्ताविकाबरोबरच उपस्थितांचे स्वागत केले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, आ. सा. वि. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मोहन भोईर, नुकताच ज्यांचा ’पंढरीच्या वाळवंटात’ हा चित्रग्रंथ पंढरपूर येथे प्रकाशित झाला ते प्रकाश पाटील या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी राजेंद्र नाईक यांनी केले. स्व. दि. बा. पाटीलसाहेब व प्रकल्पग्रस्तांच्या वेदना या विषयांवर आधारित असलेल्या या कविसंमेलनात सी. बी. म्हात्रे, अरुण म्हात्रे, हरिश्चंद्र माळी, प्रकाश ठाकूर, गणेश म्हात्रे, ए. डी. पाटील, हरिभाऊ घरत, मोहन पाटील, मनोज ठाकूर, गुणवंत पाटील, मारुती बागडे, सुरज गोंधळी, सोमनाथ घरत, बी. डी. घरत, प्रमोद म्हात्रे, प्रज्ञा म्हात्रे आदी कवींनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या व उपस्थित रसिकांना लोकनेते स्व. दि. बा. पाटीलसाहेब यांच्या बहुमोल कार्याची जाणीव करून दिली. सर्व उपस्थित कवींना प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार धनंजय गोंधळी, इतिहासकार काशिनाथ मढवी, आगरी कवितांचे बादशाह पुंडलिक म्हात्रे, अॅड. मनोज म्हात्रे, मो. का. मढवी आदी उपस्थित होते.