Breaking News

ग्रामविकासाचा उत्सव

रायगड जिल्ह्यात विधानसभेची भाजपकडे एकही जागा नसताना प्रशांत ठाकूर यांच्या 2014मधील विजयाने पक्षाच्या येथील यशाची सुरुवात झाली होती. त्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांच्यासह महेश बालदी आणि रविशेठ पाटील यांनीही विजय मिळवला. ताज्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर तर जिल्ह्यात शेकापचे अस्तित्वच धोक्यात येण्यास सुरुवात झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

महाराष्ट्रातील जवळजवळ 14 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे कल आता अंतिमत: हाती येऊ लागले आहेत. अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाने एकहाती जोरदार मुसंडी मारून गावपातळीवरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. जवळपास सहा हजार ग्रामपंचायतींमध्ये भाजपने बाजी मारली असून, हा पक्ष तळागाळात किती रुजला आहे याचाच पुरावा या निवडणुकांनी समोर आला आहे. अर्थात याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोळस नेतृत्वाला आणि धोरणांना द्यावे लागेल तसेच गावखेड्यांमध्ये निरपेक्षपणे अहोरात्र काम करणार्‍या भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचेही हे यश म्हणावे लागेल, तथापि या विजयाचे सारे श्रेय भाजपनेच घ्यावे असे म्हणणे अर्धसत्य ठरेल. कारण भाजपच्या विजयामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीच्या

नाकर्तेपणाचाही मोठा वाटा आहे. महाविकास आघाडीचा सावळागोंधळ ग्रामीण जनतेच्या पसंतीला उतरलेला नाही हेच हाती आलेल्या निकालांवरून दिसून येते. आघाडीतील तिन्ही सत्ताधारी पक्ष भाजपची शक्ती कमी करण्यासाठी एकवटले होते, परंतु मूल्याधिष्ठित राजकारण आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या फळीच्या जोरावर भाजपने हा तिहेरी हल्ला सहज परतवला. भाजपचे राज्यातील समंजस नेतृत्व आणि स्थानिक पातळीवरील भाजपच्या प्रामाणिक नेत्यांनी केलेले काम याच्या जोरावर महाराष्ट्राचे पाऊल ग्रामविकासाच्या दिशेने पडताना दिसले. रायगड जिल्ह्यात विशेषत: पनवेल तालुक्यात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने बाजी मारली आहे. वर्षानुवर्षे शेकापच्या आधिपत्याखाली असलेल्या पनवेल आणि उरणमधील अनेक ग्रामपंचायतींवर भाजपने झेंडा फडकवला आहे. शेकापची दादागिरी, गुंडगिरी, भ्रष्टाचार आणि विवेक पाटील यांचे कर्नाळा बँक प्रकरण शेकापला या निवडणुकीत भोवले आहे. त्यामुळे आता हळूहळू पनवेल, उरणच नव्हे तर अख्ख्या रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण बदलू लागले आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघातील 14 पैकी नऊ आणि उरण मतदारसंघातील 10 पैकी पाच ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था हा सशक्त लोकशाहीचा पाया असतो. महात्मा गांधींच्या मनातील ग्रामस्वराज्य याच मार्गाने प्रत्यक्षात आणता येईल हे खरेच. महाराष्ट्रातील छोटी-मोठी गावे, खेडी यांच्या हातात विकासाची दोरी कधीच आली नव्हती. पंतप्रधान मोदी यांच्या गावकेंद्री धोरणांमुळे आज आपल्याला ग्रामविकासाची नवनवीन स्वप्ने बघता येऊ लागली आहेत. अर्थात यापुढील प्रवास वाटतो तितका सोपा नाही. ग्रामविकासाचे स्वप्न प्रत्यक्षात आणावयाचे असेल तर सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करायला हवेत. निवडणुकीच्या काळातील हेवेदावे, भांडणे, राजकीय डावपेच, पक्षीय राजकारण हे सारे मागे टाकून निवडून आलेल्या गावकारभार्‍यांनी आपल्या गावाच्या विकासासाठी तन-मन झोकून कामाला लागले पाहिजे. पंतप्रधान मोदी यांनी ग्रामविकासाला केंद्रबिंदू मानून भारताचा विकासरथ जोराने पुढे हाकला आहे. त्यांच्या डोळस नेतृत्वाखालीच संपूर्ण ग्रामविकासाचे लक्ष्य गाठता येईल यात शंका नाही.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply