मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या 20 दिवसांपासून बंद असलेली शाळा-महाविद्यालये येत्या सोमवार (दि. 24)पासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विद्यार्थी, पालकांसह शिक्षक, शिक्षणतज्ज्ञांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
शालेय शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जानेवारीपासून पहिली ते बारावीचे सर्व वर्ग सुरू सुरू होणार आहेत. जिथे रुग्णसंख्या कमी असेल तिथे शाळा सुरू होतील. शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आला असून पालकांची समंती मिळालेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निर्बंध शिथिल करताना राज्यात शाळा-महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यात आली होती. कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना म्हणजेच लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येण्याची परवानगी देण्यात आली होती. शाळांमध्ये पात्र मुलांच्या लसीकरणावर भर देतानाच कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करीत शाळा सुरू होत्या, मात्र ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागताच जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात शाळा आणि महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातून केवळ इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची स्थिती चिंताजनक नसल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वच स्तरांतून शाळा सुरू करण्याबाबत मागणी होऊ लागली होती. त्यामुळे सोमवारपासून शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते. अखेर शाळा-महाविद्यालये सुरू करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला आहे.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper