Breaking News

समाजाचे आधारवड : संजयआप्पा ढवळे

कोणतीही संस्था, संघटना, पक्ष मजबूत करण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असते. त्यावर सर्वच निर्भर असते. ज्या ठिकाणी उत्तम नेतृत्व ती संस्था, संघटना, असोसिएशन, राजकीय पक्ष नावारूपाला व भरभराटीला आल्याशिवाय राहत नाही. असेच एक सक्षम नेतृत्व संजयआप्पा द्वारकानाथ ढवळे यांच्या रूपाने माणगाव तालुक्यात भारतीय जनता पक्षाला लाभले आहे. त्यांचा आज गुरुवारी (दि. 21) वाढदिवस आहे.

माणगाव तालुक्यातील इंदापूर गावातील गरीब कुटुंबात 21 जानेवारी 1966ला जन्मलेले संजयआप्पा यांनी आपल्या आयुष्यात कष्ट, जिद्द व दूरदृष्टीच्या जोरावर यशाची शिखरे गाठली. आपल्या कर्तबगारीच्या जोरावर त्यांनी समाजमनाला जिंकले. समाजात काम करताना त्यांनी गरीब जनता केद्रबिंदू मानून काम केले. गरिबांना भेडसावणार्‍या अडीअडचणी, त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी आप्पांची नेहमीच धडपड व तळमळ असते. शालेय विद्यार्थ्यांना तसेच गरजू व्यक्तींना मदतीचा हात देण्यात आप्पांचा नेहमीच अग्रक्रम राहिला आहे. त्यांचे हे स्वभावगुण सुरुवातीपासूनच आहेत. गरीब जनतेसाठी त्यांची नेहमीच मदत असते. त्यांच्या या स्वभावगुणांमुळे त्यांनी आज माणगाव तालुक्यात आपली एक विशेष ओळख निर्माण केली आहे.

समाजात अनेक श्रीमंत माणसे आपण सारे जण पाहतो, पण त्यापैकी काहींचीच दुसर्‍यांना मदत करण्याची दानत असते. तशी दानत आप्पांच्या अंगी आहे. आपण समाजाचे काहीतरी देणेकरी लागतो या उदात्त भावनेने आप्पा समाजासाठी योगदान देत असतात. हे सारे कार्य करीत असताना आप्पा भारतीय जनता पक्षाचे गेली अनेक वर्षे निष्ठेने व प्रामाणिकतेने काम करीत आहेत. त्याचे फळ त्यांना भाजपने निश्चितच दिले आहे.

कै. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत 1997 साली भाजपमध्ये प्रवेश केलेले आप्पा रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांचे अत्यंत निकटचे व विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. आप्पांनी विकासकामे मागायची व ती ठाकूर पिता-पुत्रांनी द्यायची असे समीकरणच आहे. 2014मध्ये केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आणि पक्षश्रेष्ठींनी आप्पांना माणगाव तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष केले. आप्पांनी या योजनेच्या माध्यमातून 2014 ते 2019 दरम्यान अनेक निराधार व्यक्तींना लाभ मिळवून दिला. या कार्यामुळे गोरगरीब जनता आजही आप्पांचे नाव आवर्जून घेताना दिसते.

भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून आप्पांनी अनेक वर्षे चांगल्या प्रकारे काम केले आहे. त्यामुळे ते तालुक्यात चांगल्या प्रकारे पक्ष संघटना बळकट करू शकतात, हा विश्वास बाळगून पक्षश्रेष्ठींनी आप्पांवर माणगाव तालुक्याची धुरा सोपविली आहे. तालुका अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच आप्पांनी दोन-चार दिवसांतच येथील तहसील कार्यालयासमोर पक्षाचे जनसंपर्क कार्यालय उभारले. त्याचे उद्घाटन रायगड जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री तथा माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष उपस्थितीत 17 जानेवारी 2018 रोजी करण्यात आले. तालुक्यातील पुरुष व महिला कार्यकर्त्यांना संघटित करून त्यांना पक्षाची ध्येयधोरणे तसेच केंद्र व राज्याच्या विविध लोकाभिमुख सरकारी योजनांची माहिती तळागाळातील जनेतपर्यंत पोहचविण्याचा सल्ला दिला.

पक्षहितासाठी सर्वांनी संघटित होऊन कामाला लागा, पक्ष तुमच्या कार्याची निश्चित दखल घेईल, असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला आहे.

लॉकडाऊनमुळे अनेकांचे कामधंदे बंद पडले होते. या काळात संजयआप्पा ढवळे यांनी गोरगरीब व गरजू जनतेला अन्नधान्यांच्या किटचे वाटप केले, तसेच कोरोना काळात योद्ध्यासारखे लढणार्‍या विविध क्षेत्रांतील व्यक्तींना सॅनिटायझर, मास्क, पीपीई किटचे वाटप केले. त्यांनी कोरोना काळात आपली व आपल्या कुटुंबाची चिंता न करता कोविड योद्ध्याची भूमिका बजावली. माणगाव तालुका पत्रकार संघाने याची दखल घेऊन त्यांना 2018मध्ये ’सेवाभावी कार्यकर्ता’ पुरस्काराने, तर 2020मध्ये कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित केले आहे. आप्पांना दीर्घायुष्य लाभून त्यांचे सामाजिक कार्य असेच पुढे सुरू राहावे हीच त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!

-सलीम शेख, माणगाव-रायगड

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply