पनवेल ः रामप्रहर वृत्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या सोडवून त्यांना न्याय द्यावा यासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने सोमवारी (दि. 24) विमानतळ काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची सुरुवात ओवळे फाटा येथे सकाळी 10 वाजता होईल. पनवेल तालुक्यात होऊ घातलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी सन 2008पासून विविध संघटना, संस्था व प्रकल्पग्रस्तांची सिडकोकडे सातत्याने मागणी आहे. मागील वर्षी 10 जून रोजी साखळी आंदोलन, 24 जूनला लाखो भूमिपुत्रांच्या उपस्थितीत सिडको घेराव आंदोलन, 9 ऑगस्ट क्रांती दिनी गावागावांत मशाल मोर्चा झाला, तर यंदा 13 जानेवारी रोजी भूमिपुत्र निर्धार परिषद अशी लक्षवेधी ऐतिहासिक आंदोलने झाली. दुसरीकडे सिडकोने मात्र या सार्वत्रिक मागणीकडे दुर्लक्ष करीत याविषयी गुपचूप केलेला ठराव विखंडित करण्याचा निर्णय आजवर घेतलेला नाही. या पार्श्वभूमीवर 13 जानेवारी रोजी झालेल्या भूमिपुत्र निर्धार परिषदेत विमानतळबाधित 27 गावांच्या प्रलंबित समस्या सोडवण्याविषयी सिडकोस अल्टिमेटमही देण्यात आला होता. याकरिता पोलीस अधिकार्यांच्या पुढाकाराने 20 जानेवारीला सिडको प्रशासनाबरोबर 27 गाव विमानतळबाधित प्रतिनिधी आणि विमानतळ नामकरण कृती समिती प्रतिनिधी यांची सिडको भवनात बैठक घेण्यात आली, मात्र सिडको प्रशासन थातूरमातूर उत्तरे देत आपली नैतिक जबाबदारी टाळत असल्याचे बैठकीत स्पष्ट दिसून आले. विमानतळाचे काम बंद पडल्याशिवाय सिडको वठणीवर येणार नसल्याने 24 जानेवारीला विमानतळाचे काम बंद पाडण्याचे सर्वानुमते घोषित करण्यात आले आहे. सिडकोच्या मुजोरीविरोधातील या आंदोलनात कोविडचा प्रोटोकॉल पाळून सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.