कर्जत : बातमीदार
शहरातील सलून चालकाने आपल्या दुकानातील केसांनी भरलेली पोती उल्हास नदीच्या पात्रात टाकली होती. त्याबद्दल उल्हास नदी संवर्धन टीमने केलेल्या तक्रारीवरून नगरपालिका प्रशासनाने शहरातील वेस्टर्न लूक सलूनवर कारवाई केली असून, यापुढे असे प्रकार करणार्यांवर मुंबई अधिनियम अॅक्टनुसार कारवाई केली जाईल, असे संकेत नगरपालिकेने दिले आहेत.
कर्जत शहरातील केश कर्तनालयात (सलून) कापलेले केस पोत्यांमध्ये भरून मागील काही दिवसांपासून उल्हास नदीपात्रात टाकण्यात येत होते. पर्यावरणप्रेमी समीर सोहोनी आणि त्यांची संघटना मागील काही वर्षांपासून उल्हास नदी स्वच्छता अभियान राबवत आहे. नदीत केसांची पोती टाकण्यात येत असल्याने पाणी प्रदूषित होत असल्याचे या संघटनेच्या लक्षात येताच त्यांनी याचा शोध घेतला आणि कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्याकडे संबंधित सलून व्यावसायिकावर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्याची दखल घेऊन मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी नदीपात्रात केस टाकणार्या वेस्टर्न लूक सलूनचे मालक शाबीर मलिक यांच्यावर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक व उपद्रवकारक नागरी घनकचरा नियम 2016 चे उल्लंघन केले म्हणून कारवाई करण्याचे आदेश दिले व सलूनचे मालक शाबीर मलिक यांच्यावर मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 115/117नुसार कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती कर्जत नगरपालिकेकडून देण्यात आली आहे.