Breaking News

नेरळ-माथेरान घाटातील अपघात टळला

जिप्सी धडकली संरक्षक भिंतीला; प्रवासी सुखरूप

कर्जत ः बातमीदार

मुंबईतील काही पर्यटक कुटुंबासह माथेरान येथे रविवारी (दि. 24) सकाळी येण्यास निघाले होते. जिप्सीतून आलेले पर्यटक नेरळ-माथेरान घाटातून प्रवास करताना घाटातील एस टर्न या अवघड वळणावर तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने जिप्सी दगडी कठड्यावर चढली. दरम्यान, सुदैवाने जिप्सीमधील सर्व प्रवासी सुखरूप असून जिप्सी हेलकावे खात उभी होती. हा प्रकार पाहून घाटातून प्रवास करणार्‍यांचा थरकाप उडाला होता.

माथेरानला पर्यटनासाठी मुंबईतून काही वाहने निघाली होती. त्यात प्रामुख्याने कुटुंब एकत्र प्रवास करीत होती. त्यापैकी एमएच 03-6666 क्रमांकाची जिप्सी गाडी नेरळ-माथेरान घाटातून प्रवास करताना वेगाने रस्ता कापत होती. त्या वेळी घाटातील वॉटर पाइप स्टेशन सोडल्यानंतर असलेल्या तीव्र चढावाचा अंदाज जिप्सीचालकाला आला नाही. त्यामुळे जिप्सी थेट कठड्यावर आदळली, मात्र त्या ठिकाणी असलेली संरक्षण भिंत मजबूत असल्याने जिप्सीचा अर्धा भाग कठड्यावर चढूनही संरक्षक भिंत तुटली नाही. संरक्षक भिंत तुटली असती, तर जिप्सी किमान 200 फूट खोल दरीत कोसळून मोठा अपघात घडला असता. जिप्सी संरक्षक भिंतीला धडकली त्या वेळी जिप्सीत चार प्रवासी होते. त्यातील चालक वगळता तीन महिला प्रवासी होत्या.

पर्यटकांचे दैव बलवत्तर म्हणून जिप्सीमधून प्रवास करणारे सर्व जण बचावले. जिप्सी दुपारपर्यंत घाटातील रस्त्यावर संरक्षक भिंतीला अर्धवट तरंगत असल्याचे भयावह चित्र सर्वत्र दिसत होते. अपघातानंतर गाडीतील प्रवासी तेथून आपल्या नातेवाइकांच्या वाहनांतून माथेरानकरिता निघून गेल्याने त्यांची नावे समजू शकली नाहीत. अनेक वर्षांनंतर माथेरान घाटातील मोठा अपघात टळल्याने स्थानिक समाधान व्यक्त करीत आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply