Breaking News

तहसीलदारांच्या आश्वासनानंतर पोलीस मित्र संघटनेचे उपोषण मागे

कर्जत ः बातमीदार

कर्जत येथील लोकमान्य टिळक चौकात पोलीस मित्र संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी महसूल विभागातील तलाठ्यांच्या कारभाराबाबत उपोषण सुरू केले होते, मात्र तीन दिवस झाले तरी तेथे कोणतेच अधिकारी फिरकले नाहीत. अखेर चौथ्या दिवशी तहसीलदार उपोषणस्थळी आले व त्यांनी एका महिन्यात आपली मागणी पूर्ण होईल, असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

7 डिसेंबर 2020 रोजी तलाठ्यांच्या कारभाराबाबत पोलीस मित्र संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष रमेश कदम आणि माजी जिल्हा उपाध्यक्ष दशरथ मुने उपोषणाला बसले होते. 9 डिसेंबर रोजी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या हस्ते 15 दिवसांत चौकशी करण्याचे लेखी पत्र देऊन संबंधितांची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले, मात्र महिना उलटून गेला तरीही आश्वासन फक्त कागदोपत्री राहिले. त्याचे निराकरण न झाल्याने पुन्हा सोमवार (दि. 18)पासून पोलीस मित्र संघटनेने टिळक चौकात उपोषण छेडले, मात्र तीन दिवस झाले तरी कोणताच अधिकारी फिरकला नव्हता. यामागचे कारण अस्पष्ट असल्याने नागरिकांत प्रश्न निर्माण होत होता. थोडक्यात अधिकारीवर्ग फक्त मोठमोठ्या उपोषण, आंदोलन ठिकाणी भेटी देतात, मात्र सर्वसामान्यांच्या आंदोलनाकडे पाठ फिरवली जाते. असा भेदभाव केला जात असल्याची खंत उपोषणकर्ते कोकण विभागाचे अध्यक्ष रमेश कदम यांनी व्यक्त केली होती.

उपोषणकर्त्यांनी शासकीय अधिकार्‍यांच्या गलथान कारभाराविरोधात घोषणा देऊन निषेध नोंदविण्यात आला. या वेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष चौधरी, जिल्हा निरीक्षक हनुमंत ओव्हाळ, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील पाटील, प्रभारी हरेश काळे, ठाणे जिल्हाध्यक्ष नीरजा अंबेरकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वनिता जाधव, साईनाथ मुने, एकनाथ कोळंबे, किरण पोस्टेकर, भास्कर मुने आदी पदाधिकारी उपस्थित होते.चौथ्या दिवशी सायंकाळी कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, पोलीस निरीक्षक अरुण भोर उपोषणस्थळी पोहचले. त्यांनी पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश पदाधिकारी व उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. त्या वेळी 30 दिवसांत कार्यवाही पूर्ण करण्याचे आश्वासन तहसीलदार देशमुख यांनी उपोषणकर्ते पोलीस मित्र संघटनेचे कोकण सचिव रमेश कदम यांना दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

Check Also

अखिल भारतीय टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोष विजेती

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय आंतर संस्थात्मक टेबल टेनिस …

Leave a Reply