अलिबाग एसटी आगाराचा स्तुत्य उपक्रम; प्रवाशांचा उदंड प्रतिसाद
अलिबाग ः प्रतिनिधी
कोरोनाच्या संकटकाळात एसटीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. अजूनही त्यातून एसटी सावरलेली नाही. अशा वेळी उत्पन्न वाढवण्याबरोबरच प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटीकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. त्या अनुषंगाने अलिबाग एसटी आगाराने अष्टविनायक दर्शन सहलसेवा सुरू केली असून, आगारप्रमुख अजय वनारसे यांच्या उपस्थितीत तिचा शुभारंभ झाला.
दर शनिवार-रविवार अशी दोन दिवस ही सहल असणार आहे. पहिल्याच प्रयत्नात बुकिंग फुल झाले असून, पुढील आठवड्याचे बुकिंगदेखील सुरू झाले. यासाठी प्रत्येक प्रवाशाकडून 910 रुपये इतके प्रवास भाडे आकारले जाणार आहे. या सेवेबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त केले असून, त्याचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटीतर्फे करण्यात आले आहे. या वेळी अलिबाग एसटी आगाराचे कर्मचारी, चालक, वाहक उपस्थित होते.
कोरोनामुळे डळमळीत झालेली राज्यातील एसटी बससेवा अजूनही सुरळीत होत नाही. विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक अजूनही एसटीने प्रवास करीत नाहीत. फेर्यादेखील अनियमित आहेत. त्याचा एसटीच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होत आहे. केवळ अलिबाग एसटी आगाराला दरमहा 45 लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा भरून काढणे सहज शक्य नाही, परंतु किमान तो कमी करण्याचा प्रयत्न एसटीकडून केला जात आहे. त्याला चांगले यश मिळताना दिसत आहे.
उत्पन्नात वाढ करण्याबरोबरच एसटीवरील प्रवाशांचा विश्वास वृद्धिंगत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यापुढे आणखी काही नवीन प्रयोग राबवण्याचा आमचा संकल्प आहे.
-अजय वनारसे, आगारप्रमुख, अलिबाग