Breaking News

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा; फायनलसाठी तीन संघांत चुरस

दुबई : वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियाचा आगामी दक्षिण आफ्रिका दौरा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आला. त्यामुळे त्याचा अप्रत्यक्ष फायदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) गुणतक्त्यात दुसर्‍या स्थानी असलेल्या न्यूझीलंडला झाला आणि त्यांना थेट फायनलचे तिकीट मिळाले, पण न्यूझीलंडविरूद्ध अंतिम सामन्यात कोणता संघ खेळणार याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. या स्थानासाठी भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तिन्ही संघांना संधी आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतक्त्यानुसार सध्या भारत पहिल्या स्थानी, ऑस्ट्रेलिया तिसर्‍या स्थानी, तर इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानी आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचायचे असल्यास आगामी कसोटी मालिकेत भारतीय संघाला किमान दोन कसोटी सामने जिंकणे गरजेचे आहे तसेच इंग्लंडला एकापेक्षा जास्त कसोटी सामने जिंकण्यापासून रोखायचे आहे. या मालिकेचा निकाल 4-0, 3-0, 3-1, 2-0, 2-1 यापैकी काहीही आला तरी भारताचे अंतिम फेरीचे तिकीट पक्के होईल, पण मालिकेचा निकाल इंग्लंडच्या बाजूने 4-0, 3-0, 3-1 यापैकी काहीही लागला तरी इंग्लंडसाठी अंतिम फेरीचे दरवाजे उघडतील. महत्त्वाची बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाची कसोटी मालिका रद्द झाली असली तरी ते डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर गेलेले नाहीत. भारत-इंग्लंड कसोटी मालिका बरोबरीत सुटली किंवा अनिर्णित राहिली तर ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळेल. याशिवाय जर भारत दोनपेक्षा जास्त सामने हारला आणि इंग्लंडला तीनपेक्षा जास्त सामने जिंकता आले नाहीत तरीही ‘कांगारूं’ना अंतिम फेरीचे तिकीट मिळेल. म्हणजेच मालिका 0-0, 1-1, 2-2 अशी सुटली किंवा निकाल भारताच्या बाजूने 1-0 असा लागला किंवा निकाल इंग्लंडच्या बाजून 1-0, 2-0, 2-1 यापैकी काहीही लागला तर ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत धडक मारेल.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply