Breaking News

राम मंदिरासाठी 250 शिल्पकारांची गरज

अयोध्या : वृत्तसंस्था

रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन विवादावर सुप्रीम कोर्टाने शनिवारी ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. हे भव्य राम मंदिर उभारण्यासाठी आणखी पाच वर्षांचा कालावधी लागेल. या निकालाच्या निर्णयाची प्रतीक्षा असलेल्या विश्व हिंदू परिषदेने मंदिराचा आराखडा आधीच तयार करून ठेवला आहे. राम मंदिर निर्मितीच्या कार्यशाळेशी संबंधित पर्यवेक्षकांच्या म्हणण्यानुसार, भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी किमान पाच वर्षे लागतील आणि निर्मितीसाठी अविश्रांत आणि अथक काम करणार्‍या 250 विशेषज्ञ शिल्पकारांची गरज आहे. विश्व हिंदू परिषदेच्या मंदिर निर्मिती कार्यशाळेशी संबंधित पर्यवेक्षकाच्या म्हणण्यानुसार, या क्षणी या कार्यशाळेत कुणीही शिल्पकार नाही. रजनीकांत सोमपुरांच्या नेतृत्वाखाली येथे मंदिर उभारणीसाठी शिळांवर नक्षीकाम करण्यात येत होते, मात्र सोमपुरा यांचे याच वर्षी जुलैमध्ये निधन झाले. विश्व हिंदू परिषदेच्या या कार्यशाळेत 1990पासून मंदिरासाठी काम सुरू होते. गेल्या तीन दशकांपासून या ठिकाणी दररोज आठ तास शिळांवर नक्षीकाम करण्यात येत आहे, पण आतापर्यंत झालेले काम हे मंदिराचे निम्मे बांधकाम होईल इतकेच आहे. याचाच अर्थ 212 खांबांच्या (पिलर) या मंदिराचे 106 खांब तयार आहेत. मंदिर निर्मितीसाठीच्या कार्यशाळेत सध्या कुणीही कारागीर उपलब्ध नाही. जर या ठिकाणी काम पुन्हा सुरू करायचे असेल, तर आम्हाला किमान 250 विशेषज्ज्ञ कारागिरांची गरज लागेल आणि मंदिर निर्मितीसाठी त्यांना किमान पाच वर्षांचा अवधी द्यावा लागेल, असे राम मंदिर निर्मितीच्या कामाची देखरेख करणारे अन्नुभाई सोमपुरा यांनी सांगितले.

50 टक्के काम पूर्ण

आराखड्यात निम्मे खांब  तयार आहेत. मंदिराच्या गाभार्‍याशी संबंधित कामेही पूर्ण झाली आहेत. मार्बलच्या चौकटींचे कामही पूर्ण झाले आहे, मात्र अजूनही 50 टक्के काम पूर्ण व्हायचे आहे. त्यात 106 खांब तयार करणे आणि मंदिराचा कळस आणि छताचे काम शिल्लक आहे, अशी माहिती राम मंदिर निर्मितीच्या कामाची देखरेख करणारे अन्नुभाई सोमपुरा यांनी दिली.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply