Breaking News

बंद मोबाइल टॉवर शेतकर्यांसाठी डोकेदुखी

महाडमधील शेतकर्‍यांना महसूल विभागाकडून दंडात्मक कारवाईची नोटीस

महाड : प्रतिनिधी

तालुक्यातील अनेक गावात गेली काही वर्षे बंद असलेले मोबाईल टॉवरची विनाशेती दंडात्मक वसुली झालेली नाही. महसूल विभागाने आर्थिक वर्ष समाप्तीआधी मोबाईल टॉवरकडून दंडवसुली मोहीम सुरु केली आहे. त्याच्या नोटीसा शेतकर्‍यांना देण्यात आल्याने आणि कंपन्यांनी बंद केलेले टॉवर जागीच पडून राहिल्याने शेतकर्‍यांसाठी हे बंद टॉवर एक डोकेदुखीच ठरली आहे.

आर्थिक वर्ष समाप्तीसाठी महसूल विभागाने विनाशेती दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. यामध्ये तालुक्यातील सर्व मोबाईल टॉवरचादेखील समावेश आहे. जागेचा वापर विनाशेती न करताच व्यवसाईक पद्धतीने होत असल्याने शासनाने या मोबाईल टॉवरकडून दंडवसुली सुरु केली आहे. मात्र महाड तालुक्यात अनेक गावातील मोबाईल टॉवर गेली अनेक वर्ष बंद आहेत. मोबाईल सेवा पुरवणार्‍या काही कंपन्या बंद झाल्या तर काही कंपन्या अन्य कंपन्यांमध्ये सामील झाल्या आहेत. मोबाईल टॉवर बसवताना शेतकर्‍यांबरोबर होत असलेल्या करारनाम्यानुसार शेतकर्‍याला जमीन भाडे दिले जाते. जमीन विनाशेती केलेली नसल्याने महसूल विभागाकडून शेतकरी आणि मोबाईल टॉवर कंपन्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र महाड तालुक्यात ज्या ठिकाणी मोबाईल टॉवर बंद झाले आहेत त्या कंपन्यांकडून शेतकर्‍याला कोणतीच पूर्वकल्पना अगर जमिनीतील मोबाईल टॉवर हटवण्यात आलेला नाही. प्रशासनालादेखील याबाबत कोणतीच कल्पना देण्यात आलेली नसल्याने जमीन वापराबाबत शेतकर्‍यांना नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. कंपन्यांचे पत्ते बदलण्यात आलेले असल्याने त्यांचा मात्र संपर्क होत नाही आणि जमीन भाडेदेखील देण्यात आलेले नाही. यामुळे शेतकरी कात्रीत सापडला आहे.

महाड तालुक्यात जवळपास 15 मोबाईल टॉवर बंद अवस्थेत आहेत. यामध्ये एअरटेल, रिलायन्स, जिटीएल, टाटा मोबाईल या कंपन्यांच्या टॉवरचा समावेश आहे. या बंद टॉवरमुळे महसूल विभागाचे लाखो रुपयाचा दंड थकीत आहे. गव्हाडी गावातील टॉवरकडून सुमारे एक लाख 93हजार 840, महाडमधील टॉवरकडून दोन लाख एक हजार 680, दासगाव टॉवरकडून एक लाख 99हजार 720, टोळ बु मधील टॉवरकडून चार लाख 73हजार 920 रुपये वसूल होणे बाकी आहे.

विनाशेती वापर दंडवसुलीसाठी टॉवर कंपनी मालक आणि शेतकरी या दोघांनादेखील नोटीसा देण्यात येतात. या नोटीसा प्राप्त होताच शेतकर्‍यांना धक्का बसतो मात्र कंपन्या दाद देत नसल्याने गेली तीन ते चार वर्षाची थकबाकी राहिली आहे.

-प्रदीप कुडळ, नायब तहसीलदार, महाड

गेल्या तीन वर्षापासून माझ्या जमिनीमधील मोबाईल टॉवर बंद आहे. कंपनीच्या लोकांशी संपर्क होत नाही. कंपनीने जमीन भाडेदेखील दिलेले नाही आणि विनाशेती वापर दंडदेखील भरलेला नाही, यामुळे महाड महसूल विभागाकडून आम्हाला नोटीसा येत आहेत.

-लक्ष्मण अंबावले, शेतकरी, रा. गव्हाडी, ता. महाड

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply