माणगाव : प्रतिनिधी
शहरातील टेंबेनाका येथे बुधवारी (दि. 3) सकाळी स्कुल बसने कचरा उचलणार्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात नगरपंचायतीच्या सफाई कामगाराला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला.तर ट्रॅक्टरमधील दोन सफाई कामगार जखमी झाले.
माणगाव नगरपंचायतीचे सफाई कामगार नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी कचर्याच्या ट्रँक्टर (एमएच-11, जी-2796) सह शहरातील टेंबेनाका परिसरात कचरा गोळा करीत होते. त्या वेळी नजीर इब्राहिम गालसुलकर (वय 57, रा. दहिवली ता. माणगाव) यांनी त्यांच्या ताब्यातील स्कूल बस (एमएच-06,एस.-7602) भरधाव वेगाने चालवून कचर्याच्या ट्रँक्टर जोरात धडक दिली. या अपघातात महेश दत्तू सकपाळ (वय 19, रा.उतेखोल, ता.माणगाव), जयेश नंदकुमार जाधव (वय 24, रा. उतेखोल) आणि अनिल नारायण सुर्वे (वय 52 रा. माणगाव) हे कामगार जखमी झाले. त्यांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान महेश सकपाळ यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सागर कावळे करीत आहेत.