हक्काच्या स्टॉलची मागणी
नवी मुंबई : बातमीदार
दिव्यांग नागरिकांना स्टॉलसाठी 200 चौरस फुटांची जागा देण्यासह प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व अपंग सेना ऑफ नवी मुंबई यांनी सिडको भवन समोर आंदोलन सुरू केले आहे. वारंवार मागणी व चर्चा करुनही सिडको प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने सकाळपासून धरणे आंदोलन सुरू केले असून सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिव्यांगांनी दिला आहे.
शासनाच्या निर्णयाप्रमाणे दिव्यांग नागरिकांना किमान 200 चौरस फुटांची जागा स्टॉलसाठी देणे आवश्यक आहे, परंतु सिडकोकडून कमी जागा देण्यात आली आहे. नियमाप्रमाणे जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. 2012 व 2016 मध्ये न्यायालयाने तसे निर्देश देऊनही सिडकोकडून चालढकल होत असल्याचा आरोप दिव्यांग नागरीकांनी केला आहे. 2019 मध्ये सिडकोने तीन महिन्यात स्टॉलसाठी जागा देण्याचे आश्वासन देऊनदेखील अद्याप ते दिलेले नाहीत. यावर तोडगा न निघाल्यास 10 ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व अपंग सेना ऑफ नवी मुंबई यांनी दिला होता. त्यामुळे सकाळपासून सिडको भवनसमोर दिव्यांग नागरिकांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे.