Breaking News

युनियन बँकेचे पोलादपूर एटीएम सात महिने बंद

पोलादपूर : प्रतिनिधी

तालुक्यातील एकमेव युनियन बँकेच्या पोलादपूर शाखेतील एटीएम बंद होऊन तब्बल सात महिने झाले आहेत, मात्र ग्राहकांची गैरसोय आजतागायत सुरूच आहे. दरम्यान, या कालावधीमध्ये बँकेने एटीएम सेवाशुल्कापोटी किमान साडेतीन हजार ग्राहकांचे प्रत्येकी 180 रुपयांपर्यंतची रक्कम परस्पर खात्यातून लांबविण्याचा प्रकार नियमित सुरू ठेवला आहे.

पोलादपूर तालुक्यात 2009 सालापासून युनियन बँक ऑफ इंडियाची शाखा सुरू झाली असून, आजमितीस पाच हजारांहून अधिक खातेदारांची संख्या असलेल्या या शाखेतून किमान साडेतीन हजार ग्राहकांना एटीएम कार्ड देण्यात आली आहेत. गेल्या वर्षी 14 जून 2020 रोजी या शाखेच्या एटीएम सेंटरला आग लागल्याने ही सेवा बंद झाली. या दरम्यान आंध्र आणि कॉर्पोरेशन बँकेसोबत युनियन बँक ऑफ इंडियाची संलग्नता प्रक्रिया सुरू झाल्याने पोलादपूर शाखेतील एटीएम मशिनच्या दुरुस्तीचे काम लांबणीवर पडले आहे, मात्र पोलादपूर शाखेच्या एटीएम कार्डधारक ग्राहकांकडून प्रत्येकी 180 रुपयांपर्यंतची रक्कम गेल्या वर्षी खात्यातून परस्पर कपात करण्यात आली आहे.   

एटीएम मशिन बंद असल्याने युनियन बँकेच्या ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. अन्य बँकांच्या एटीएम मशिनमधून रक्कम काढल्यास सेवाशुल्काची वेगळी रक्कम या ग्राहकांच्या खात्यामधून कपात होऊन भुर्दंड सोसावा लागत आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply