बलुचिस्तान : वृत्तसंस्था
क्रिकेटचे मैदान सहसा अशा एखाद्या ठिकाणी असते जिथून काही अफलातून दृश्य पाहता येतात. जगभरात अशी अनेक क्रिकेटची मैदाने आहेत. भारतातही धरमशाला येथील क्रिकेट स्टेडियम, मरिन ड्राईव्हपाशी असणारं मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियम ही त्यापैकीच काही नावे. तिथे क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या लॉर्ड्सलाही विसरून चालणार नाही. आता याच यादीमध्ये समावेश होणार आहे ते म्हणजे बलुचिस्तानमधील अतिशय सुरेख असे गवादर क्रिकेट स्टेडियम.
सोशल मीडियावर फक्र-ए-आलम या ट्विटर अकाऊंटवरून गवादर क्रिकेट स्टेडियमचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. ज्यामघ्ये अतिशय रुक्ष पण त्यातही निसर्गसौंदर्याची वेगळी परिभाषा मांडणार्या एका स्थळाबाबतची माहिती मिळत आहे. ओसाड आणि निर्मनुष्य पर्वतरांगांमध्ये साकारण्यात आलेले गवादर क्रिकेट स्टेडियम सध्याच्या घडीला आकर्षणाचा विषय ठरत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदनेही (आयसीसी) ट्विटरवरून या स्टेडियमचे काही फोटो शेअर केले आहेत. याहून अधिक सुंदर क्रिकेट स्टेडियमचे फोटो दाखवा, आम्ही वाट पाहतोय, असे आयसीसीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.