Breaking News

नवी मुंबईत बेवारस वाहनांमुळे स्वच्छतेला खीळ

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबई शहरातील सर्वच नोडमध्ये मुख्य रहदारीचे रस्ते व अंतर्गत रस्ते यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात बंद वाहने असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. बंद अवस्थेत असलेल्या वाहनाखाली मोठ्या प्रमाणात कचरा साठून राहिल्यामुळे त्या ठिकाणी नियमित स्वच्छता करता येत नाही व शहर स्वच्छतेत अडथळा निर्माण होतो.

नवी मुंबईत बेवारस वाहनांवर कारवाई करून पालिकेकडून ही वाहने डम्पिंग ग्राउंडवर नेण्यात येतात. या वाहनांची माहिती पालिकेने वेबसाईटवर प्रसिद्ध केली असून मालकांनी ही वाहने शुल्क भरून सोडवून न्यावीत असे आवाहन पालिकेने केले आहे.

स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये ’निश्चय केला- नंबर पहिला’ हे ध्येय नजरेसमोर ठेवून सामोरे जात असताना अशाप्रकारच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या बेवारस वाहनांमुळे शहर स्वच्छतेला खीळ बसते आहे. याबाबत महानगरपालिकेमार्फत अशी वाहने हलविणेबाबत वारंवार आवाहन करण्यात येत असून अशा वाहनांवर रितसर नोटीसाही संबंधित विभाग कार्यालयामार्फत लावण्यात आल्या आहेत. तथापि अनेक वाहन मालकांकडून प्रतिसाद मिळताना दिसत नाही.

महापालिकेने नियमितपणे वाहने हटविणेबाबत संबंधित वाहन मालकांना, संबंधित विभाग कार्यालयामार्फत नोटीसा बजाविलेल्या होत्या तसेच पालिकेकडून वृत्तपत्रातून जाहीर आवाहनही करण्यात आलेले होते, मात्र संबंधित मालकांनी त्यांची बंद अवस्थेत असलेली वाहने अद्यापही हटविलेली नसल्याने  शहरातील सर्वच नोडमध्ये बंद वाहने ठिकठिकाणी मुख्य रहदारीचे रस्ते व अंतर्गत रस्ते यावर मोठ्या प्रमाणात उभी असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे सन 2016 पासून ते आजतागायत महापालिकेकडून बंद अवस्थेत उभी असलेली वाहने उचलण्याची कारवाई करण्यात आलेली आहे.

या जाहीर सूचनेन्वये, नवी मुंबई महापालिकेच्या वतीने नवी मुंबई शहरातील तमाम सूज्ञ व जागरुक नागरिक असलेल्या संबधित वाहन मालक यांना आवाहन करण्यात येते की, सन 2016 मध्ये परिमंडळ 1 व 2 अंतर्गत येणार्‍या विभाग कार्यालयांकडून मुख्य रहदारीचे रस्ते व अंतर्गत रस्ते यावर बंद अवस्थेत उभी असलेली वाहने उचलण्याबाबतची कारवाई करण्यात आलेली आहे. उचलण्यात आलेली वाहने ही कोपरखैरणे येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या डंपींग ग्राऊंडवर तसेच ऐरोली व महापे येथे जमा करण्यात आलेली आहेत.

या जमा करण्यात आलेल्या 2126 वाहनांची सूची नवी मुंबई पालिकेच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने कारवाई करून उचललेल्या वाहनांच्या मालकांनी महापालिकेच्या वेबसाईटवर आपल्या वाहनाविषयी माहिती घ्यावी. ज्या मालकांची ही वाहने आहेत त्यांनी संबंधित मालकाने हे जाहीर आवाहन प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून 15 दिवसांच्या आत महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. संबंधित वाहनाची मूळ कागदपत्रे दाखवून विभाग कार्यालयात नियमानुसार शुल्कचा भरणा करावा व वाहन जमा असलेल्या ठिकाणाहून आपले वाहन स्वखर्चाने घेऊन जावे असे आवाहन पालिकेने केले आहे.

उर्वरित वाहनांबाबत यापुढील काळात नवी मुंबई पालिका कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्विकारणार नाही. याबाबत संबंधित उप प्रादेशिक वाहतूक अधिकारी यांनी नोंद घ्यावी. जे वाहन मालक 15 दिवसांच्या आत वाहन घेऊन जाणार नाहीत. अशी वाहने नवी मुंबई महानगरपालिकेकडून बेवारस वाहन म्हणून घोषित केली जातील व त्यांची भंगारात विक्री करण्यात येईल. -अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply