Breaking News

वीज जोडणी तोडल्यास तीव्र आंदोलन करू; अॅलड. महेश मोहिते यांचा महावितरणला इशारा

अलिबाग : प्रतिनिधी

वीज ग्राहकाना बिल वाढवून दिले आणि  या बिलाच्या वसुलीसाठी कुणाचीही वीज जोडणी तोडली तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी महावितरणला दिला आहे. महावितरणने 35 लाख वीज ग्राहकांना वीज जोडण्या   तोडण्याच्या नोटीस पाठवल्या आहेत. त्याविरोधात भाजपने शुक्रवारी (दि. 5) राज्यात महावितरण कार्यालयावर  टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन केले. भाजपा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग येथील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयात घुसून कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना गेटवर आडवले. भाजप कार्यकर्त्यांनी तेथेच ठिय्या आंदोलन केले. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. अखेर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता कुंदन भिसे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आपले म्हणणे वरिष्ठांना कळवतो, चुकीची बीले असतील तर  त्यात दुरुस्ती करू देतो, 10 दिवसांच्या आत आपल्याशी चर्चा करतो, असे आश्वासन कुंदन भिसे यांनी या वेळी दिले. भाजपतर्फे कुंदन भिसे यांना निवेदन देण्यात आले. महावितरणने 35लाख वीज ग्राहकांना वीज जोडण्या  तोडण्याची नोटीस पाठवली आहे. राज्यातील चार कोटी जनतेला अंधारात ठेवण्याचे पाप करण्याचा त्यांचा मानस आहे. राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्यांना वेठीस धरून कारभार चालवण्याचे काम महाविकास आघाडी सरकारकडून सुरू आहे. जिल्ह्यातील वीज जोडण्या न तोडता आपण दिलेल्या नोटिसा त्वरित मागे घेऊन ग्राहकांना वीज माफी देण्यात यावी. तसे न झाल्यास पुढे उग्र आंदोलन करण्यात येईल, असे या निवेदनात म्हटले आहे. भाजपा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते  यांच्या नेतृवाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात भाजपा अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम धर्मा म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस सतीश लेले, निलेश महाडीक, सुनील दामले, अजित भाकरे, अशोक वारगे, नितीन गुंड, संतोष पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply