नवी दिल्ली : वृत्तसंस्था
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेच्या 2021च्या हंगामासाठी 18 फेब्रुवारी रोजी लिलाव होणार आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेलसह 13 खेळाडूंची मूळ किंमत सर्वाधिक दोन कोटी रुपये आहे. प्रत्येक संघात कमाल 25 खेळाडूंना स्थान देता येते. लिलावात 814 भारतीय आणि 283 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. 207 आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू उपलब्ध असून, यात 21 भारतीय खेळाडू आहेत तसेच 863 बिगरआंतरराष्ट्रीय खेळाडूंचा मोठा भरणा असून, यात 743 भारतीय व 68 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. लिलावात वेस्ट इंडिजच्या सर्वाधिक 56 क्रिकेटपटूंचा समावेश आहे. याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाचे 42 आणि दक्षिण आफ्रिकेचे 38 खेळाडू उपलब्ध आहेत. संलग्न राष्ट्रांच्याही 27 खेळाडूंची यात नोंद आहे. इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांनी लिलावातून माघार घेतली आहे.
दोन कोटी रुपये मूळ किंमत असलेले खेळाडू केदार जाधव, हरभजन सिंह, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव स्मिथ, शाकिब अल हसन, मोईन अली, सॅम बिलिंग्स, लियाम प्लंकेट, जेसन रॉय, मार्क वुडे, कॉलिन इन्ग्राम, अॅरोन फिंच, ख्रिस मॉरिस.