चेन्नई : वृत्तसंस्था
इंग्लंड संघाने दिलेल्या 579 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तिसर्या दिवसाखेर भारतीय संघाने सहा गड्यांच्या मोबदल्यात 257 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारतीय संघ अद्याप 321 धावांनी पिछाडीवर आहे. तिसर्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वॉशिंगटन सुंदर (33) आणि आर. अश्विन (8) नाबाद होते. दिग्गज फलंदाज झटपट माघारी परल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांनी संयमी फलंदाजी करीत भारतीय संघाचा डाव सावरला. ऋषभ पंतने झटपट फलंदाजी करीत धावसंख्या वाढवली, मात्र अवघ्या नऊ धावांनी त्याचे शतक हुकले. पंत चौथ्यांदा ‘नर्वस 90’चा शिकार झाला आहे. भारतीय संघ अडचणीत सापडला तेव्हा अनुभवी चेतेश्वर पुजाराने एका बाजूने सावध खेळ करीत डाव सांभाळला होता, तर दुसर्या बाजूने पंतची आक्रमक खेळी सुरू होती. अखेर ही भागीदारी तोडण्यात फिरकीपटू बेसला यश आले. त्याने 51व्या षटकात पुजाराला त्याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. पुजारा रॉरी बर्न्सच्या हातून झेल बाद होऊन माघारी परतला. त्याने 143 चेंडूंत 11 चौकारांसह 73 धावा केल्या. पंत आणि पुजारानं 119 धावांची भागीदारी केली. पुजारा बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर पंतला साथ देण्यासाठी मैदानावर आला आहे. त्यानंतर पंतने षटकार खेचत भारताला 200 धावाही पार करून दिल्या, मात्र नव्वदीच्या घरात पोहचल्यानंतर पंत पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद झाला. त्याला बेसनेच बाद केले. पंतने 88 चेंडूत 91 धावा चोपल्या. या खेळीत नऊ चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. इंग्लंडकडून फिरकीपटू डॉम बेस याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या, तर जोफ्रा आर्चरने दोन बळी मिळवले.