सर्व प्रकल्पांची घेतली माहिती
कर्जत : बातमीदार : देशातील पहिले कृषी पर्यटन केंद्र असलेल्या कर्जत तालुक्यातील सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्राला कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी भेट दिली आणि ते सगुणाबागेच्या प्रेमातच पडले. सगुणाबागेत पूर्ण दिवस थांबून कुलगुरूंनी तेथे सुरू असलेल्या सर्व प्रकल्पांची माहिती घेतली.दरम्यान, सगुणाबागेत सुरू असलेली संशोधने शेतकरी वर्गासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.
कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. संजय सावंत हे कर्जतयेथील कृषी संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी आले होते. कर्जत केंद्रामधील सहयोगी शास्त्रज्ञांच्यासोबत पावसाळ्यातील उपाययोजनांची माहिती आणि भात बियाणांची उपलब्धता तपासून घेतल्यानंतर डॉ. संजय सावंत नेरळ येथील सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्राला भेट देण्यासाठी पोहचले. तेथे कृषी रत्न पुरस्कार प्राप्त शेखर भडसावळे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी अनुराधा भडसावळे आणि संशोधन केंद्राचे डॉ. रवींद्र मर्दाने सोबत होते. डॉ. सावंत यांनी आधी केंद्राचे आकर्षण असलेल्या तलावातील घराला म्हणजे भेट दिली.
त्यानंतर शेखर भडसावळे यांनी कृषी पर्यटन म्हणजे काय? त्याचा उगम सगुणाबागेत कसा झाला? कृषी पर्यटनाचे शेतकर्याला काय फायदे? याबाबत विस्तृत माहिती दिली. त्यानंतर कुलगुरू डॉ. सावंत यांनी सगुणा राईस टेक्निक, सगुणा वनसंवर्धन टेक्निक सगुणा जलसंवर्धन तंत्र याबाबत विस्तृत माहिती घेतली. वणवे रोखण्यासाठी सगुणाबागेने सगुणा वनसंवर्धन तंत्र विकसित केले असून वन विभागासोबत सुरू असलेले काही प्रायोगिक प्रकल्प यावेळी संगणकावर कुलगुरू डॉ. सावंत यांंना दाखविण्यात आले. जलप्रदूषण कमी करण्यासाठी सगुणा जलसंवर्धन तंत्र विकसित केले असून त्याच्या कामाबद्दल माहिती देण्यात आली.
कोणत्याही कृषी विद्यापीठात न पोहचणार्या शेतकर्यांना सगुणाबाग हे विद्यापीठ वाटत आहे. शेतकर्यांना कोणतीही माहिती घेण्यासाठी आणि प्रकल्प पाहण्यासाठी येथे खुला प्रवेश असल्यामुळे शेतकरी सगुणाबागेच्या प्रेमात पडले आहेत. येथील नवीन तंत्राचा शेतकर्यांनी वापर करावा.
-डॉ संजय सावंत, कुलगुरू, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली