चेन्नई : वृत्तसंस्था
भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातून 43 वर्षीय व्यक्तिचेही पदार्पण झाले आहे. 2021 वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात व्ही. रमेश कुमार यांना तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनकडून कॉल गेला… इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटीसाठीच्या खेळपट्टीच्या क्युरेटरची जबाबदारी स्वीकाराल का, असे त्यांना विचारण्यात आले. रमेश यांनाही हे आश्चर्यकारक वाटले. यापूर्वी त्यांनी कधीच क्युरेटरची जबाबदारी पार पाडली नव्हती, इतकेच काय तर प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्येही ते कधीच क्युरेटर नव्हते. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत त्यांना चेपॉकची खेळपट्टी तयार करायची होती आणि हे आव्हान त्यांनी पूर्ण केले. ’मला आश्चर्याचा धक्का बसला. मी तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनकडे काही दिवसांची मुदत मागितली. ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर मी माझा बिझनेस कसा संभाळेन हा प्रश्न माझ्यासमोर होता आणि त्यासाठी कुटुंबीयांशी मला बोलायचे होते,’ असे रमेशने ‘क्रिकइन्फो’शी बोलताना सांगितले. रमेश कुमार हे सिटी तिरपूर येथील कपड्यांचे व्यापारी आहेत. पिच मेकिंगची कला शिकूनच क्युरेटर बनतात आणि त्यानंतर अनुभवाच्या जोरावर खेळपट्टी बनवण्यास तयार होतात, पण रमेशकडे या गोष्टींचा कोणताही अनुभव नाही. ते आपल्या महाविद्यालयीन जीवनात चांगला अॅथलिट होते. 110 मीटर धावण्याचा शर्यतीमध्ये त्याने तामिळनाडूचे प्रतिनिधीत्व केले होते, त्याचबरोबर ते राज्याच्या रिले संघाचेही सदस्य होते. रमेश यांनी 1996 साली दोन राष्ट्रीय पदके जिंकलेली आहे. जुलै 2018मध्ये रमेश यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) एक कोर्स पूर्ण केला आणि कोईंम्बतूर, त्रिपूरा व सालेम येथे 16, 19 व 23 वर्षांखालील स्पर्धांसाठी खेळपट्टी तयार केल्या आहेत. 2019च्या आयपीएलमध्ये त्यांनी चेपॉकच्या खेळपट्टीची जबाबदारी पाहावी, अशी तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनची इच्छा होती, परंतु व्यापारामुळे त्याला तेव्हा जमले नव्हते. अखेर भारत वि. इंग्लंड कसोटीत ते स्वप्न पूर्ण झाले आहे.