मुंबई : प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासामधील सोनई येथील शेतकर्यांनी मुळा सहकारी साखर कारखान्यावर व शिवेसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर आरोप करीत आपल्या शेतामधील उभा ऊस पेटवून दिला आहे. गडाख यांच्या ताब्यातील साखर कारखाना या शेतकर्यांच्या ऊसाला तोड देत नाही. त्यांची नोंद घेतली गेलेली नाही, कारण ते विरोधक आहेत. त्यांनी गडाख यांच्याविरोधात पॅनल उभे केले होते. म्हणून केवळ राजकीय विरोधातून असे केले जात असल्याचा या शेतकर्याचा आरोप आहे. यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ढोंगीपणा करणारे शिवसेनेचे मंत्री शेतकर्यांचा कसा गळा घोटतात, त्याचे हे उदाहरण. शेतमाल खरेदी करतानासुद्धा राजकीय मापदंड लावणार्या पक्षांना खरे तर लाज वाटली पाहिजे. हीच का शिवसेनेला अभिप्रेत शिवशाही, असा सवाल फडणवीस यांनी शेतकरी ऊस पेटवून देत असतानाचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करीत शिवसेनेला केला आहे.
आपल्याला मते देत नाही, म्हणून त्या शेतकर्यांचा ऊसच खरेदी न करण्याच्या या धोरणातून शेतकरी आता स्वत:चा ऊस शेतातच पेटवून देत आहेत. ऊस विकत घ्यायचा नाही, शेतकर्यांना तोडूही द्यायचा नाही. परिणामी नोंद नाही आणि बँकेतून पुढचे कर्ज नाही. म्हणजे शेतकर्यांनी जगायचेच नाही, याकडे फडणवीस यांनी ठाकरे सरकारचे लक्ष वेधले आहे.
मुळा साखर कारखान्याच्या माध्यमातून शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांनी नेवास्यात हा प्रताप चालविला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ हस्तक्षेप करीत या शेतकर्यांना न्याय मिळवून द्यावा, ही माझी माफक अपेक्षा आहे. किमान अन्नदात्याला तरी पक्षीय चष्म्यातून बघू नका, असेही फडणवीस यांनी शिवसेनेला उद्देशून म्हटले आहे.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …